कल्याण- डोंबिवलीत ‘शांततेचा भंग’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण- डोंबिवलीत ‘शांततेचा भंग’
कल्याण- डोंबिवलीत ‘शांततेचा भंग’

कल्याण- डोंबिवलीत ‘शांततेचा भंग’

sakal_logo
By

कल्याण, ता. ८ (बातमीदार) : सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या कल्याण-डोंबिवली शहरातील ‘शांतता’ दिवसेंदिवस भंग पावत असून ध्वनिप्रदूषणात वाढ झाली आहे. महापालिका हद्दीतील १३ शांतता क्षेत्रांमध्ये आवाज मर्यादा पातळी सामान्यपेक्षा दुपटीने वाढल्याने शहराच्या गोंगाटात भर पडली आहे, असा अहवाल पालिकेच्या पर्यावरण विभागाने दिला आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० अन्वये विविध क्षेत्रांतील ध्वनीची कमाल मर्यादा आखून देण्यात आली आहे, पण कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये तिन्ही क्षेत्रांत दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याने ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे. वाढती वाहनसंख्या आणि वाहतूक कोंडी ही त्यामागची मुख्य कारणे असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये वाहनांची संख्या वाढत चालली आहे. प्रत्येक घरामागे एक वाहन अशी अवस्था सध्या शहरांची आहे. चारचाकीच्या तुलनेत दुचाकी वाहने सर्वाधिक आहेत. त्यात रिक्षांची गर्दी वाढत आहे. सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने रोज सकाळ-संध्याकाळ खासगी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरतात, पण अरुंद रस्ते आणि रस्ते कामांमुळे वाहतूक कोंडीचा सामाना करावा लागतो. वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात हॉर्न वाजवले जातात. कानठळ्या बसवणाऱ्‍या हॉर्नचा आवाज हा या शहरांची शांतात भंग पाडण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत; तर दुसरीकडे रात्री दहानंतर डीजेसह ध्वनिक्षेपकांना बंदी घातली असतानाही लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाने अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होतानाही दिसत आहे. या जाचातून शांतता क्षेत्रही सुटत नसल्याचे पालिकेच्या अहवालातून आढळून आले आहे.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत १३ शांतता क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. या क्षेत्रासह रहिवासी क्षेत्रातील ध्वनिप्रदूषण पातळी मोजण्यासाठी नेमलेल्या संस्थेकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार ऑक्टोबर ते मे २०२२ मध्ये वाडेघर, वारावी, चक्कीनाका, फडके रोड, लाल चौकी, घरडा सर्कल, आधारवाडी, शिवाजी चौक आदी रहिवासी क्षेत्रामध्ये आवाजाची मर्यादा अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

.....
आवाज पातळीची मर्यादा डेसिबलमध्ये
क्षेत्र ः सकाळी ६ ते रात्री १० - रात्री १० ते सकाळी ६
औद्योगिक क्षेत्र : ७५ - ७०
व्यावसायिक क्षेत्र ः ६५ - ५५
निवासी क्षेत्र ः ५५ - ४५
शांतता क्षेत्र ः ५० - ४०
....
रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम
कल्याण डोंबिवलीमधील रहिवाशांमध्ये मानसिक परिणाम, ऐकायला कमी येणे, बहिरेपणा, वाढलेला रक्तदाब, चिडचिडेपणा, थकवा, हृदयाची धडधड वाढणे आदी त्रास वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
.....
आवाजाची नोंद दिवस/ रात्र डेसिबलमध्ये
कल्याण
रुक्मिणीबाई रुग्णालय - ५९.२ / ५४.२
सत्र न्यायालय परिसर - ६३ .७ / ५७. ७
बिर्ला कॉलेज - ६३ .७ / ६१.५
के. सी. गांधी हायस्कूल - ६२.६/ ५०.९
मोहिंदरसिंग काबूल सिंग स्कूल - ६४.९/ ५७.३
शारदा विद्यामंदिर - ६८.३ / ६५.३

ठाकुर्ली
मनपा ४० नंबर शाळा- ६४ . १/ ५३.

डोंबिवली
शास्त्रीनगर हॉस्पिटल - ६३. २ / ५८.२
मंजुनाथ विद्यालय - ६५ .८ / ५९.४
जोंधळे हायस्कूल - ६१.७/ ५५.८
व्ही. पी. रोड पेंडसेनगर - ६०.६ / ५२.९
...
ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न
ध्वनिप्रदूषणाबाबत दरवर्षी तपासणी करून अहवाल प्रसिद्ध केला जातो. ध्वनिप्रदूषणात वाढ होत असून ते कमी करण्यासाठी बोर्ड लावणे तसेच सिग्नल यंत्रणा बसवणे आदी उपाय स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पालिकेमार्फत सुरू असल्याचे पालिका अधिकाऱ्‍यांनी स्पष्ट केले.