
क्लास ऑफ एटी थ्री चित्रपटावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप
सकाळ वृत्तसेवा
मुंबादेवी, ता. ८ (बातमीदार) : ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या क्लास ऑफ एटीथ्री या चित्रपटावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात अश्लील दृश्य आणि संवाद दाखवत महाराष्ट्र पोलिसांची विशेषत: मुंबई पोलिसांची बदनामी केल्याबद्दल चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, संवाद लेखक यांच्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा राज्यभरात रस्त्यावर येऊन उग्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात दिला. या वेळी त्यांच्यासोबत, संभाजी ब्रिगेड चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष जुबेर खान आणि मुंबई अध्यक्ष ॲड. कल्पना उपाध्याय उपस्थित होते.
राज्य सरकारला इशारा देताना राणे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांच्या जीवनावर आधारित पोलिस भरती, कर्तव्य आणि गुन्हेगारी क्षेत्रावर केलेल्या कारवाईवर आधारित ओटीटी प्लॅटफॉर्मवर २०२० मध्ये ‘क्लासेस ऑफ एटीथ्री’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे कथानक पोलिस भरती ट्रेनिंग कॅम्प, वसतिगृहापासून सुरू झालेले दाखवण्यात आले. या दरम्यान सुरुवात ते शेवटपर्यंत चित्रपटात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर आणि कर्तव्यदक्ष असणारे महाराष्ट्र पोलिस यांच्याबाबत अश्लील चित्रीकरण करीत जगभरात बदनामी केली आहे. त्यामुळे रीड हेस्टिंग अँड सीईओ सारा दियोस, रेड चिली एंटरटेनमेंटचे निर्माते शाहरुख खान, त्यांची पत्नी गौरी खान, गौरव वर्मा, लेखक अभिजीत देशपांडे, अतुल सबरवाल आणि अभिनेता भूपेंद्र जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विशेष आयुक्त देवेन भारती यांनी याबाबत तत्काळ माहिती घेऊन ही कारवाई करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.