स्वच्छता कामगारांऐवजी नागरिकांकडून स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छता कामगारांऐवजी नागरिकांकडून स्वच्छता
स्वच्छता कामगारांऐवजी नागरिकांकडून स्वच्छता

स्वच्छता कामगारांऐवजी नागरिकांकडून स्वच्छता

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ : ‘स्वच्छतेसाठी पुढाकार नागरिकांचा, आजचा दिवस स्वच्छताकर्मींच्या सन्मानाचा’, म्हणत आज (ता. ८) वाशी विभागातील तब्बल दोन हजारहून अधिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपापल्या क्षेत्रातील स्वच्छतेची जबाबदारी घेतली. स्वतः झाडू हातात घेत आपल्यातील स्वच्छताप्रेमाचे व संवेदनशीलतेचे प्रत्यक्ष दर्शन घडविले. विशेष म्हणजे आज, रविवार असूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शहर स्वच्छतेसाठी दररोज लवकर उठून आपले कर्तव्य बजावणाऱ्या स्वच्छताकर्मींनाच एक दिवस सुटी देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचे वाशीतील नागरिकांनी निश्चित केले होते. आज सकाळी ६.३० वाजल्यापासून वाशी विभागातील विविध परिसरात रस्ते, पदपथ झाडताना व तो कचरा गोळा करताना उत्साही नागरिक रस्त्यारस्त्यावर दिसू लागले. यासोबतच रोजच्या स्वच्छता कामापुरती कामगारांना सवलत देत त्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन नवी मुंबई महापालिका शाळा क्र. २८, सेक्टर १५ येथे करण्यात आले होते. तत्पूर्वी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वच्छता कामगारांनी एकत्र जमत तेथून सेक्टर १४ वाशी येथील जुने विभाग कार्यालय मार्गे शाळेपर्यंत जनजागृतीपर रॅली काढून स्वच्छता संदेशाचे प्रसारण केले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त आणि स्वच्छ भारत मिशनचे पालिका नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दोन दिवसांत या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सुयोग्य नियोजन केले. वाशी विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी दत्तात्रेय घनवट, तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे व आपल्या सहकाऱ्यांसह वाशी विभाग कार्यक्षेत्रातील विविध स्वयंसेवी संस्था, स्वच्छताप्रेमी जागरूक नागरिकांना एकत्र आणून लोकसहभागातून आगळावेगळा उपक्रम यशस्वी केला. परिमंडळ १ विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, स्वच्छता अधिकारी सुधीर पोटफोडे यांनी उपक्रम आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

या संघटनांचा हातभार
वाशी विभाग कार्यक्षेत्रातील सीआयएसएफ जवान समूह, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर १०, महाराजा ज्येष्ठ नागरिक संघ सेक्टर १७, टॅक्सी टेम्पो युनियन सेक्टर १७, के टाईप मार्केट असोसिएशन सेक्टर १५ -१६, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय एनसीसी समूह, लोकमान्य टिळक मार्केट गणेश मंडळ सेक्टर १, एस एस टाईप असोसिएशन सेक्टर २, प्रेरणा सेवा मंडळ सेक्टर ६, इच्छापूर्ती क्रिकेट क्लब (वाशीगाव), मरिआई मच्छीमार सोसायटी वाशीगाव, किराणा स्टोअर वेल्फेअर, सेक्टर ९ ए भाजी मार्केट, टिळक कॉलेज एनएसएस विद्यार्थी सेक्टर २८, नाना वाळुंज जॉगिंग ग्रुप आणि क्रिकेट ग्रुप सेक्टर २९, एचपी पेट्रोल पंप कामगार आणि मालक सेक्टर १४, कपडा मार्केट व्यापारी आणि कामगार सेक्टर १५, शीतल भोईर महिला समूह जुहूगाव, दर्शना भोईर महिला समूह जुहूगाव, जनता मार्केट सेक्टर ७ व्यापारी मंडळ, अपना कन्स्ट्रक्शन कंपनी सेक्टर ७- ८, सागर विहार क्रिकेट मित्र मंडळ, मिनी मार्केट सेक्टर ९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीम सेक्टर ९ अशा विविध संस्थांच्या पदाधिकारी, सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता.