
जीवनासाठी नैतिकता, प्रामाणिकपणा आवश्यक
मुंबई, ता. ९ (बातमीदार) ः नैतिकता असलेल्या शिक्षणाचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण असे आहे, त्यामुळे शिक्षण घेताना नैतिकता व प्रामाणिकपणा अंगी बाणल्यास चांगले जीवन घडवता येते, असे प्रतिपादन मुंबई महापालिका शिक्षण विभागाचे माजी शिक्षणाधिकारी आबासाहेब जाधव यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात केले.
मुंबई महापालिका शिक्षण विभाग सहकारी बॅंकेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा बँकेच्या ग्रॅंट रोड कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या गुणगौरव सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आबासाहेब जाधव उपस्थित होते. तसेच मुख्य वक्त्या म्हणून डॉ. रंजना पाटील, बँकेचे अध्यक्ष तथा पालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, बँकेचे उपाध्यक्ष किरण पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
या वेळी डॉ. रंजना पाटील यांनी सांगितले, की माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग अवलंबून खऱ्या अर्थाने आपले जीवन समृद्ध करता येईल. तसेच जीवनाचा मार्ग निश्चित करण्यासाठी आपल्यासमोर रोल मॉडेल उभे केले पाहिजे; तर अध्यक्षीय भाषणात शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी बक्षीस हे भविष्य बदलत असते. विद्यार्थ्यांनी नवीन विश्वाला सामोरे जाताना माणूस म्हणून जगणे महत्त्वाचे आहे असे सांगून बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.