पालिकेची मालमत्ता भाडेवाढ अयोग्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेची मालमत्ता भाडेवाढ अयोग्य
पालिकेची मालमत्ता भाडेवाढ अयोग्य

पालिकेची मालमत्ता भाडेवाढ अयोग्य

sakal_logo
By

भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महानगरपालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी बांधलेले मंगल कार्यालय, समाज मंदिरे, उद्याने, मैदाने आदींच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयावर मिरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी आक्षेप घेतला आहे. महानगरपालिका विसर्जित झालेली असल्यामुळे भाड्यात वाढ करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे ही वाढ रद्द करुन जुन्या दरानेच भाडे घेण्यात यावे, अशी मागणी जैन यांनी आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे केली आहे.
महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी तसेच मालमत्तांच्या भाड्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाढ करण्यात आली नसल्यामुळे भाडेवाढ करण्याचा निर्णय नुकताच आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतला आहे. त्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेले मंगल कार्यालय, छोट्या समारंभांसाठी असलेली समाज मंदिरे, खेळासाठीची मैदाने, मालिकांच्या चित्रिकरणासाठी देण्यात येत असलेली उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणे यांचा समावेश आहे. तसेच उत्सव व लग्न समारंभासाठी रस्त्यावर बांधण्यात येत असलेल्या मंडपांच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. त्याला आमदार गीता जैन यांनी विरोध केला आहे.

-----------------------
पालिका विसर्जित झाल्यामुळे निर्णय चुकिचा
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात महानगरपालिकेची मुदत संपुष्टात आली आहे. त्यानंतर शासनाने आयुक्त दिलीप ढोले यांनाच प्रशासक म्हणूनही जबाबदारी दिली असून महासभेचे अधिकार प्रदान केले आहेत; परंतु शासनाने दिलेल्या आदेशांमध्ये भाडेवाढ करण्यासंबंधी नमूद करण्यात आलेले नाही. महापालिका विसर्जित झाल्यानंतर महापालिकेच्या ताब्यातील सर्व मालमत्ता राज्य सरकारच्या ताब्यात आहेत. या मालमत्तांचे भाडे वाढवण्यासंदर्भात केवळ राज्य सरकारच निर्णय घेऊन शकते. त्यामुळे ही भाडेवाढ अयोग्य असून ती रद्द करुन जुन्या दरानेच भाडे आकारण्यात यावे, असे पत्र आमदार गीता जैन यांनी आयुक्त दिलीप ढोले यांना दिले आहे.