
महागाई, बेरोजगरीवर भाजपचे मौन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : देशातील महागाई आणि बेरोजगारी या दोन मुद्द्यांवर एकही भाजपचा नेता लोकसभा किंवा विधानसभेत बोलण्याची हिम्मत दाखवत नाही. मूळ विषयांचा लोकांना विसर व्हावा, याकरिता भाजपकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी केला.
जनजागर यात्रेच्या निमित्ताने त्या सोमवारी ठाण्यात आल्या होत्या. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या राज्य महिला अध्यक्षा विद्या चव्हाण, ऋता आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे आदी उपस्थित होते. या वेळी फौजिया खान म्हणाल्या, की जितेंद्र आव्हाड हे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर बोलतात म्हणून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशासमोर बेरोजगारी, महागाई हे प्रश्न उभे आहेत, पण त्यावर बोलणे टाळून लोकांमध्ये तेढ कशी निर्माण होईल, यादृष्टीने भाजपची नेतेमंडळी काम करतात. आज राजकारणाचा दर्जा पूर्णपणे घसरत चालला आहे. महिलांच्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्या चव्हाण म्हणाल्या, की ही यात्रा म्हणजे सावित्रीच्या लेकींचा जागर असून तो महागाई आणि बेरोजगारीविरोधात आहे. गेली सात वर्षे देशात केवळ घोषणांचा पाऊस झाला. केंद्र सरकारने दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकरी मिळेल असे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात अनेकांना नोकरी गमवावी लागली. पेट्रोल-डिझेलबरोबरच सीएनजीचे दरही वाढले आहेत. परिणामी जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाली. या सर्वांकडे दुर्लक्ष करून रोज काही विवाद निर्माण करायचे. लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम देशातील सुरू आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. आता लोकांनी जागृत होऊन महागाईचा जागर केला पाहिजे. आम्हाला महागाई कधी कमी होणार, बेरोजगारी कधी कमी होणार यात स्वारस्य आहे, असे चव्हाण शेवटी म्हणाल्या.
...
अटक करण्याचे षड्यंत्र
जे विरोधात बोलतात त्यांना अटक करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात फक्त बलात्कारचा गुन्हा दाखल करून दाखवाच, आम्ही पोलिस ठाण्याला घेराव घालू, असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिला. आमच्या कोणत्याही नेत्यांना जेलची भीती हे सरकार दाखवू शकत नाही. भगतसिंग २४ व्या वर्षी फासावर गेले होते. आम्ही त्यांच्या पावलावर चालत असल्याचेदेखील चव्हाण यांनी सांगितले.