
मुंबईला विद्रूप करणारे अनधिकृत बॅनर्स हटवा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबई सौंदर्यीकरण करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. उड्डाण पुलाखाली सुशोभीकरण, भिंतीवर चित्र रंगवणे अशा एकूण ५०० ठिकाणी काम सुरू आहे. मुंबईचे सौंदर्यीकरण होत असताना मुंबई विद्रूप करणारे अनधिकृत पोस्टर, बॅनर, होर्डिंग हटवा, असे आदेश पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
मुंबईला विद्रूप करू नका, असे आदेश देत अनधिकृत पोस्टर, बॅनर, होर्डिंग झळकावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सक्त मनाई केली आहे. तरीही राजकीय पक्षांचे बॅनर, पोस्टर व होर्डिंग ठिकठिकाणी झळकलेली दिसतात. त्यामुळे कारवाईची मोहीम हाती घेण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे.
मुंबईतील ५०० ठिकाणी सुशोभीकरणाच्या कामांचे नियोजन करण्यात आले असून काही कामे प्रगतिपथावर आहेत, अशा सर्व ठिकाणी पथदिवे व प्रकाशयोजना अधिक प्रभावी करण्याचेही निर्देश दिले आहेत. महापालिका अखत्यारितील पुलांची अधिक प्रभावी साफसफाई करण्यासह तेथे आकर्षक रंगरंगोटी करण्यासह वाहतूक बेटांचेही सुशोभीकरण केले जाणार आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध ठिकाणी सुशोभीकरणाची कामे वेगाने करण्याचेही निर्देश दिले आहेत.
...
३५,५८८ बॅनरवर कारवाई
मागील दोन वर्षांत एकूण ३५,५८८ बॅनरवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान ३५ एफआयआर नोंदवण्यात आले असून ८६५ जणांविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.