
धावत्या रेल्वेमधून पडल्यानंतरही प्रवासी बचावला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ट्रेनला गर्दी असल्याने धावत्या कोणार्क एक्स्प्रेसमध्ये चढत असताना पडल्याने प्रवाशाचे दैव बलवत्तर असल्याने तो थोडक्यात बचावला. रेल्वे आणि फलाटाच्या अंतरात तो अडकल्याने, तसेच वेळीच तिकीट तपासणीसाने प्रसंगावधान दाखवत रेल्वेची आपत्कालीन साखळी खेचल्याने तरुण वाचला. त्याच्या कमरेला खरचटल्याने दुखापत झाली आहे. मूळ झाडखंड निवासी रहिवासी असलेले रामजीवन श्यामदेव माझी (वय ३८) हे ठाण्यातून कामासाठी पुण्याला निघाले होते. यासाठी ते आज (ता. ९) दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील फलाट क्रमांक ७ वर कोणार्क एक्स्प्रेसची वाट पाहत होते. रेल्वे आल्यावर अचानक गर्दी झाल्याने त्यामध्ये चढता आले नाही, म्हणून त्यांनी धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा तो प्रयत्न असफल ठरला आणि ते रेल्वे आणि फलाट यांच्या रिकाम्या जागेमध्ये पडले. सुदैवाने पडल्यानंतर ते फलाटाला खेटून झोपून राहिले. याचदरम्यान टीसी मनोजकुमार यांनी रेल्वेची चेन खेचल्यावर दोन मिनिटांनी काही अंतरावर जाऊन ट्रेन थांबली. या वेळी फलाटावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस कर्मचारी विक्की आणि अमित कुमार यांनी धाव घेत त्यांना बाहेर काढले. तसेच तातडीने त्यांना प्राथमिक उपचारार्थ फलाट क्रमांक दोनवरील वन रुपी क्लिनिकमध्ये नेले.