मोखाड्याची लालचुटूक स्ट्रॉबेरी बाजारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोखाड्याची लालचुटूक स्ट्रॉबेरी बाजारात
मोखाड्याची लालचुटूक स्ट्रॉबेरी बाजारात

मोखाड्याची लालचुटूक स्ट्रॉबेरी बाजारात

sakal_logo
By

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. १० : स्ट्रॉबेरी म्हटले की डोळ्यासमोर येते ते महाबळेश्वरचे नाव. मात्र, हीच स्ट्रॉबेरी आता पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील शेतकरी उत्पादित करू लागले असून त्यांच्या शेतातील लालचुटूक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. या स्ट्रॉबेरीला नाशिक, पालघर आणि वाड्याच्या बाजारपेठेत मोठी मागणी असून तेथे प्रतिकिलो २०० रुपयांचा दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक ठिकाणीच रोजगार आणि उत्पन्न मिळू लागल्याने काही अंशी स्थलांतराला आळा बसला आहे.
मोखाडा तालुक्यात एकमेव खरिपाचे पीक हेच उत्पन्नाचे साधन होते; मात्र दोन वर्षांपूर्वी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी अनिल गावित यांनी प्रायोगिक स्ट्रॉबेरी लागवडीतून उत्पन्नाचा प्रयोग यशस्वी केला. त्या वेळी अनिल गावित यांनी मोखाड्यासारखा भागातील वातावरणाची साम्य असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी येथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नेऊन दाखवला. तसेच मोखाड्यातील वातावरण आणि जमीन स्ट्रॉबेरी पिकासाठी योग्य असल्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाड्यातील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
यंदा तालुक्यातील सायदे आणि हिरवे येथील १२ शेतकऱ्यांनी २० गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. कृषी अधिकारी सुनील पारधी आणि एस. के. फाऊंडेशनचे शिवाजी अदयाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून त्यांतून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या शेतात लालचुटूक स्ट्रॉबेरी विक्रीसाठी तयार झाली. शेतातील स्ट्रॉबेरी शेतातून तात्काळ ती काढून खोडाळा आणि मोखाड्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी या शेतकऱ्यांनी आणली आहे. येथे त्यांना साधारणपणे २०० रुपये किलो असा भाव मिळत आहे. तसेच जादा ऊत्पन्न निघत असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील स्ट्रॉबेरी नाशिक, पालघर आणि वाड्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहे. त्यामुळे मोखाड्यातील शेतकरी सुखावला आहे.

...
मोखाड्यात १२ शेतकऱ्यांनी २० गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. आता स्ट्रॉबेरी परिपक्व होऊन बाजारात विक्रीस आली आहे. यासाठी त्यांना २०० रुपये किलो असा दर मिळत आहे. काही शेतकरी नाशिक, पालघर आणि वाडा येथे स्ट्रॉबेरी विक्रीसाठी नेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दररोज सरासरी ६०० रुपये इतके उत्पन्न मिळत आहे. स्ट्रॉबेरीच्या पिकामुळे उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे.
- सुनील पारधी, तालुका कृषी अधिकारी, मोखाडा

गावातील शेतकऱ्यानी स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना स्थानिक ठिकाणीच उत्पन्न मिळू लागले आहे. परिणामी काही अंशी शेतमजुरांच्या स्थलांतराला आळा बसला आहे.
- दिलीप झुगरे, सरपंच, सायदे