उड्डाणपुलाखाली बेघरांची वस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उड्डाणपुलाखाली बेघरांची वस्ती
उड्डाणपुलाखाली बेघरांची वस्ती

उड्डाणपुलाखाली बेघरांची वस्ती

sakal_logo
By

घणसोली, ता. १० (बातमीदार)ः स्वच्छ सर्वेक्षणात पहिला क्रमांक मिळवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने शहरातील उड्डाणपुलाखालील जागा बंदिस्त करण्यात आल्या आहेत; पण घणसोलीत पालिकेच्या या प्रयत्नांना अपयश आले असून बेघरांनी केलेल्या घुसखोरीमुळे परिसराला बकाल स्वरूप आले आहे.
घणसोली - शिळफाटा उड्डाणपुलाला काही महिन्यांपासून बकाल स्वरूप आले आहे. या ठिकाणी बेघरांनी आश्रय घेतला असल्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छतेच्या प्रयत्नांनाच अपयश आले आहे. कारण एकीकडे नवी मुंबई महापालिका स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत विविध उपक्रम राबवत शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न करत आहे; तर दुसरीकडे मात्र उड्डाणपुलाखाली बेघरांनी निवारा घेतल्याने अस्वच्छता पसरलेली आहे. या बेघरांचे याच ठिकाणी राहणे, खाणे-पिणे, कपडे-भांडी होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांचा प्रादुर्भावदेखील मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने परिसरातील नागरिकांना विविध त्रासांना सामोरे जावे लागत आहे.
--------------------------------
अतिक्रमण विभाग हतबल
रात्रीच्या वेळेला तसेच दिवसाढवळ्या नशेत असलेल्या बेघरांमध्ये अनेकदा वादावादीतून मारामारीचे प्रकार घडत आहेत. त्यात महापालिकेने या ठिकाणी लोखंडाची जाळीदेखील लावली आहे. मात्र या जाळ्या तोडून आतमध्ये संसार थाटण्यात आला असल्याने नवी मुंबई महापालिकेचा अतिक्रमणविरोधी विभागदेखील कारवाई करून हतबल झाला आहे.
--------------------------------
घणसोली शिळफाटा उड्डाणपुलाखाली अनेक महिन्यांपासून बेघरांनी आश्रय घेतला आहे. पालिकेने या ठिकाणी जाळी बसवलेली आहे. पण त्याची तोडमोड केली गेली आहे. या प्रकारामुळे परिसराला बकाल स्वरूप आले असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
- संजय गायकवाड, नागरिक
--------------------------------
अनेक दिवसांपासून घणसोली उड्डाणपुलाखाली बेघरांच्या वास्तव्यामुळे महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाला बाधा निर्माण होत आहे. येथे महापालिकेने कुंपण लावूनदेखील बेघरांचा वावर आहे. त्यामुळे स्थानिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
- शीला माने, नागरिक