संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

सामूहिक अत्याचारप्रकरणी
दोघांना पोलिस कोठडी

अंधेरी, ता. १० (बातमीदार) ः विलेपार्लेहून अहमदाबादला घेऊन गेलेल्या एका महिलेवर तिच्याच परिचित मित्रासह तिघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. लालासाहेब यादव आणि शशांक सावंत अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा तिसरा सहकारी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पीडित महिला आपल्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले परिसरात राहते. तीन दिवसांपूर्वी तिला तिचा मित्र लालासाहेबने अहमदाबादला नेले होते. त्याच्यासोबत त्याचे इतर दोन सहकारी होते. अहमदाबादमध्ये सर्वांनी मद्यपान केल्यानंतर लालासाहेबने तिचे जुने फोटो दाखवून तिला ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर तिघांनी लैंगिक अत्याचार केले. शनिवारी सर्व जण अहमदाबादहून मुंबईत आल्यानंतर पीडित महिलेने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

पालिका शाळांच्या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात
मुंबई, ता. १० (बातमीदार) ः मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आणि दादर पारसी झोराष्ट्रीयन क्रिकेट असोसिएशन यांच्या सहकार्याने मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या इतिहासात प्रथमच पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी माटुंगा जिमखाना मैदानात क्रिकेट स्पर्धा घेण्यात येत आहेत. स्पर्धेचे उद्‍घाटन पालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक, सहसचिव दीपक पाटील, कमिटी मेंबर संदीप विचारे, कौशिक गोडबोले, दादर पारसी झोराष्ट्रीयन क्रिकेट असोसिएशनचे सचिव मंगेश भालेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी पालिका शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख राजेश गाडगे, पालिका शिक्षण व शारीरिक शिक्षण विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत पालिकेच्या दहा शाळांतील १४० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. अंतिम सामना दडकर मैदानावर होणार आहे.

आकांक्षा अभ्युदयनगर पब्लिक स्कूलचा वार्षिक क्रीडा सोहळा
शिवडी, ता. १० (बातमीदार) ः आकांक्षा अभ्युदय नगर मुंबई पब्लिक स्कूलच्या वतीने सोमवारी (ता. ९) अभ्युदय नगरच्या शहीद भगतसिंग मैदानावर वार्षिक क्रीडा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा सोहळा पाहण्यासाठी पालक आणि विभागातील नागरिकांनी मोठी हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक करत देशभक्तीपर गाण्यांच्या पार्श्वभूमीवर नृत्याचे सादरीकरण केले. दरम्यान, विविध खेळांच्या स्पर्धांमधील विजयी स्पर्धकांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. सहकाऱ्यांच्या जयघोषात विजयी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. त्यात माजी शिक्षक-पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या वेळी प्राचार्या फातिमा सावंत, अश्विनी लालगे, भाग्यश्री नीलपारखे, गोविंद चव्हाण व माजी प्रशासकीय अधिकारी (शिक्षण) वंदना गोसावी अतिथी म्हणून उपस्थित होत्या.