
कलाविष्कांराची उधळण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० ः स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात तिसऱ्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या नवी मुंबई शहरात पालिकेने केलेल्या सुशोभीकरणाचा महत्त्वाचा वाटा आहे. कलाकारांच्या भावविश्वातून उलगडलेल्या रंगीत छटांमुळे निर्जीव भिंतीदेखील बोलक्या झाल्या असून वळणदार सुलेखनातून साकारलेल्या कवितेच्या ओळी, सामाजिक संदेश देणाऱ्या आकर्षक शिल्पांमुळे शहराच्या सुशोभीकरणासाठी पालिकेने केलेले प्रयत्न लक्षवेधी ठरत आहेत.
नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात पहिल्या क्रमांकावर येण्याचा निर्धार केला आहे. याच अनुषंगाने सुशोभीकरणासाठी विविध संकल्पना राबवल्या जात आहेत. यात पावसाळा तसेच इतर ऋतूंमुळे भित्तिचित्रांची झालेली अवस्था पाहता पालिकेने नवनवीन संकल्पना राबवल्या आहेत. त्यात नावीन्यपूर्ण चित्रांसह विविध सामाजिक संदेश दिले जात आहेत. ही नवीन चित्रे काढताना त्यामध्ये कला, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता अशा विविध बाबींएेवजी जनजागृतीपर संदेश दिले जात आहेत. त्यासाठीच्या कल्पक संकल्पना चितारल्या जात आहेत. विशेष म्हणजे, या संकल्पना साकारण्यासाठी नवकलाकारांना प्रोत्साहित करण्यात आले आहे. सध्या शहरात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, रचना संसद कला महाविद्यालय, रहेजा स्कूल ऑफ आर्टस अशा नामांकित कला महाविद्यालयांचे विद्यार्थी नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन नवी मुंबईचे चित्र बदलण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यांच्यासोबत नवी मुंबईतील उत्तम व्यावसायिक चित्रकारही कलात्मक रंग भरत असून साधारणत: ६५० हून अधिक विद्यार्थी व कलावंत चित्रकार नवी मुंबईत ठिकठिकाणी कलेचे प्रदर्शन घडवत असून त्यामध्ये १५० हून अधिक विद्यार्थिनी, महिला चित्रकारांचादेखील समावेश आहे.
-------------------------------
- काही भित्तिचित्रांमध्ये विविध संतांच्या समाजजागृती करणाऱ्या ओव्या, अभंग व वचनांचा समावेश आहे. तसेच त्यासोबतच नामवंत साहित्यिकांच्या जीवनाला प्रेरणा देणाऱ्या काव्यपंक्तीही काही ठिकाणी अनुरूप चित्रांसह सुलेखनांकित करण्यात येणार आहेत. यंदा नवीन शिल्पाकृतींएेवजी आवश्यकतेनुसार डागडुजी करून परिसर सुशोभित केला जात आहे.
- प्रभागांमध्ये ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या कारंजांमुळे शहराला अनोखा साज आला आहे. या कारंजांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता अत्याधुनिक सी - टेक मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत शुद्ध पाण्याचा वापर केला जात आहे. याद्वारे पिण्याच्या पाण्याची बचत केली जात आहे. तसेच नागरिकांमध्ये जलबचतीचा संदेश प्रसारित केला जात दिला आहे.
- तलावांच्या जलाशयांचे कठडे व सभोवतालच्या जागेच्या सुशोभीकरणावर भर दिला जात आहे. या वर्षीचे वेगळेपण म्हणजे मुख्य रस्त्यांप्रमाणेच बॅकलेनच्या स्वच्छता आणि सुशोभीकरणावर मनाला भुरळ घालत आहेत.