निर्देशांक पुन्हा गडगडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांक पुन्हा गडगडले
निर्देशांक पुन्हा गडगडले

निर्देशांक पुन्हा गडगडले

sakal_logo
By

मुंबई, ता. १० ः जागतिक शेअर बाजारांमधील पडझडीमुळे आज (ता. १०) भारतीय शेअर बाजारांमध्येही विक्रीचा मारा आला आणि निर्देशांक एक टक्क्याहूनही जास्त कोसळले. सेन्सेक्स ६३१.८३ अंश; तर निफ्टी १८७.०५ अंशांनी कोसळला. सेन्सेक्स कसाबसा साठ हजारांवर टिकून राहिला; तर निफ्टी अठरा हजारांखाली आला.

व्याजदरवाढ केली जाईल व चढे व्याजदर काही काळ कायम ठेवले जातील, अशा आशयाची विधाने अमेरिकी फेडरल बँकेच्या अधिकाऱ्यांनी केल्याने आज जगभर सर्वच शेअर बाजारांमध्ये विक्रीचा मारा झाला. व्यवहार सुरू होताना भारतीय शेअर बाजार नफा दाखवत होते; पण नंतर विक्रीचा मारा आल्याने घसरण सुरू झाली. ती दिवसभर सुरूच राहिली. दिवसअखेर सेन्सेक्स ६०,११५.४८ अंशांवर; तर निफ्टी १७,९१४.१५ अंशांवर स्थिरावला.

आज फक्त वाहननिर्मिती कंपन्यांचे शेअर नफ्यात होते. बँका, धातुनिर्मिती कंपन्या, आयटी या सर्व क्षेत्रांच्या शेअरमध्ये नफावसुली झाली. आयटी निकालांचा हंगाम थंड सुरू झाल्याने तसेच त्यांनी येत्या सहा महिन्यांच्या मागणी चक्राबाबत सावध मतप्रदर्शन केल्यानेही बाजारात निराशेचे सावट आले. सेन्सेक्सही आज सुरुवातीला साठ हजारांच्या वर उघडला होता. नंतर तो साठ हजारांच्या खाली घसरला; पण शेवटी तो साठ हजारांवर बंद होण्यात यशस्वी झाला.
------
या शेअर्सची घसरण
आज टाटा मोटर्स सहा टक्के म्हणजे २३ रुपयांनी वाढून ४१३ रुपयांवर बंद झाला. पॉवरग्रीड, टाटा स्टिल, हिंदुस्थान युनिलीव्हर, इंडसइंड बँक या शेअरचे भावही एक टक्क्याच्या आसपास वाढले; तर भारती एअरटेल तीन टक्के घसरून ७९२ रुपयांवर बंद झाला. स्टेट बँकही दोन टक्के कोसळला. एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, टेक महिंद्र, मारुती, टीसीएस, इन्फोसिस, कोटक बँक, एशियन पेंट, अॅक्सिस बँक या शेअरचे भावही एक ते दोन टक्के पडले.