कंत्राटी कामगारांना उदरनिर्वाहाची चिंता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंत्राटी कामगारांना उदरनिर्वाहाची चिंता
कंत्राटी कामगारांना उदरनिर्वाहाची चिंता

कंत्राटी कामगारांना उदरनिर्वाहाची चिंता

sakal_logo
By

कामोठे, ता. ११ (बातमीदार) : पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ५२ कंत्राटी कामगारांचे तीन महिन्यांचे मानधन ठेकेदाराने थकवले आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता सतावत असलेले कामगार थकीत मानधन कधी मिळणार, याच्या प्रतीक्षेत आहेत.
खासगी दवाखान्यात महागडे उपचार परवडत नाहीत. त्यामुळे पनवेल उपजिल्हा रुग्णालय सामान्य कुटुंबातील रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. कोरोनाकाळात उपजिल्हा रुग्णालयातील उपचारामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी पोहचले. यानंतर रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी वाढली आहे. रुग्णालयाचा अतिदक्षता, प्रसूती, बाह्यरुग्ण विभाग नेहमी व्यस्त दिसून येत आहे. नियमित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीसाठी राज्य आरोग्य विभागाने मुंबईतील फोकस फॅसिलिटी अँड सिक्युरिटी सर्व्हिस कंपनीची तीन वर्षांपासून नेमणूक केली आहे.
या कंपनीचे अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहायक प्रयोगशाळा, एक्स रे तंत्रज्ञ, वार्डबॉय असे एकूण ५२ कंत्राटी वैद्यकीय कामगार तुटपुंज्या मानधनावर रुग्णसेवा देत आहेत. मात्र, तीन महिन्यांपासून ठेकेदाराने मानधन न दिल्यामुळे कामगार विचलित झाले असून आर्थिक संकटात सापडले आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची समस्या त्यांना भेडसावत आहे. ठेकेदाराविरोधात कुठे वाच्यता केली, तर नोकरी जाण्याची भीती मनात आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या आश्वासनावर विसंबून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी कंत्राटी कमर्चाऱ्यांचे मासिक मानधन ठेकेदाराने वेळेवर देण्याची मागणी केली आहे. तसेच, आरोग्य संचालकांना निवेदन देणार असल्याची माहिती भगत यांनी दिली आहे.

ठेकेदाराला आरोग्य विभागाने सप्टेंबर महिन्यापर्यंतचे मानधन दिले आहे. कुटुंब कल्याण आरोग्य विभाग, पुणे येथून ठेकेदार कंपनीचे पुढील महिन्याचे अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. तोपर्यंत ठेकेदाराने जबाबदारीने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन देणे अपेक्षित आहे.
- डॉ. मधुकर पांचाळ, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय

आरोग्य विभागासोबतचा करार अलिकडे संपलेला आहे. करार नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. थकीत बिलासाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. दोन-तीन दिवसांत कर्मचाऱ्यांना शिल्लक मानधन देण्याची तयारी सुरू केली आहे.
- विजय पालांडे, व्यवस्थापक, फोकस फॅसिलिटी अँड सिक्युरिटी सर्व्हिस कंपनी