
सफाई कामगारांचे ठिय्या आंदोलन
मुंबादेवी, ता. १० (बातमीदार) : आझाद मैदानात आजपासून सफाई कामगारांचे आंदोलन सुरू झाले आहे. रात्रीच्या थंडीतही हे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे. प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलक आझाद मैदानातून हटणार नाहीत, असा निर्धार सफाई कामगारांचे नेते मिलिंद रानडे यांनी केला आहे. सध्या मैदानात जवळपास ७०० कर्मचारी मुक्कामी आहेत. त्यात दीडशेच्या घरात महिला सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये दिलेल्या निवाड्यात २७०० कामगारांना मुंबई पालिकेत कायम करण्याचे आणि २०१४ पासूनची थकबाकी देण्याचे तसेच मृत कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यास पाच वर्षे उलटून गेली; मात्र न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी पालिकेने केली नाही. यातील २७०० पैकी ११०० कामगारांना नियुक्ती पत्र दिलेले नाही. त्यामुळे पालिका आयुक्त आणि राज्य सरकारने आमच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी मिलिंद रानडे यांनी केली.
या आंदोलनामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, विजय दळवी, राबिया शेख, रिटा शेडगे सहभागी आहेत. शिवसेना, काँग्रेसचा आंदोलनाला पाठिंबा आहे. आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास पालिका आयुक्ताच्या नावाने दक्षिण मुंबईत भीक मांगो आंदोलन सुरू करू, असा इशारा प्रकाश रेड्डी यांनी दिला.
...
सफाई कामगार मुंबईचा एक अविभाज्य घटक आहे. या कामगारांच्या पाठीशी आम्ही आहोत. या कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी राज्यसभेतही प्रश्न उपस्थित करणार आहे.
- कुमार केतकर, राज्यसभा सदस्य, काँग्रेस