पोलिस दलातील तक्रारींचे तत्काळ ‘समाधान’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस दलातील तक्रारींचे तत्काळ ‘समाधान’
पोलिस दलातील तक्रारींचे तत्काळ ‘समाधान’

पोलिस दलातील तक्रारींचे तत्काळ ‘समाधान’

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांची वैद्यकीय बिले, वेतन निश्चिती, पदोन्नती, पेन्शन इत्यादी कार्यालयीन समस्यांसाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाकडून ‘समाधान’ हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी व अंमलदारांना ९१३७२७९१०३ या हेल्पलाईनवर फोन अथवा व्हॉट्सॲप मेसेजच्या माध्यमातून तक्रार दाखल करता येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्तालयात मारावे लागणारे खेटे बंद होणार आहेत.
नवी मुंबई पोलिस दलातील प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासोबत पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या सुविधेसाठी ‘समाधान’ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर सर्व पोलिस अधिकारी, अंमलदारांचे प्रशासकीय कामकाजाच्या संबंधाने असलेल्या शंकांचे निरसन होणार आहे. त्याशिवाय वैद्यकीय बिले, वेतन निश्चिती, पदोन्नती, पेन्शन इत्यादी कार्यालयीन समस्या व तक्रारींचे निवारण देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी, अंमलदार यांच्यात पोलिस आयुक्तालयातील प्रशासकीय कामकाजावरून संबंधित लिपिकांसोबत होणारे वादावादीचे प्रसंगही टळणार आहेत.
-------------------------------------
आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना
- पोलिस अधिकारी-अंमलदारांना कोणत्याही प्रशासकीय कामकाजासाठी पोलिस आयुक्त कार्यालयात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनादेखील प्रशासकीय कामकाजासाठी पोलिस अधिकारी-अंमलदार यांना पोलिस आयुक्त कार्यालय परिसरात भेटण्यास, तसेच याबाबत चर्चा करण्यास मनाई करण्यात आली आहे.
-------------------
- ज्या पोलिस अधिकारी अंमलदारांना प्रशासकीय कामकाजात काही अडचणी असतील, त्यांनी त्यांच्या अडी-अडचणीचे निराकरण करण्यासाठी प्रथम समाधान हेल्पलाईनवर त्याबाबतीत तक्रार नोंदवावी. समाधान हेल्पलाईनद्वारे त्यांच्या अडचणीचे निराकरण न झाल्यास कल्याण शाखेच्या पोलिस निरीक्षकांची वैयक्तिक भेट घ्यावी. त्यानंतर पोलिस उप-आयुक्त, (मुख्यालय) यांची भेट घ्यावी, अशा स्पष्ट सूचना नवी मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
--------------------------
- पोलिस अधिकारी, अंमलदार त्यांच्या प्रशासकीय कामकाजासाठी पोलिस आयुक्त कार्यालयात विनाकारण येऊन लिपिक वर्गाशी चर्चा, हुज्जत घालत असल्याचे निदर्शनास आल्यास अथवा लिपिक वर्ग प्रशासकीय कामकाजासाठी पोलिस अधिकारी, अंमलदार यांच्याशी चर्चा करताना निदर्शनास आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
--------------------------------
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्याकरीता समाधान हेल्पलाईनमुळे कामकाजामध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. तसेच तक्रारीचे वेळेत निराकरण होऊन कर्मचाऱ्यांच्या वेळेची बचत होणार आहे.
- मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त, नवी मुंबई