
टेटवालीत सौर पथदिवे कामात भ्रष्टाचार
विक्रमगड, ता. ११ (बातमीदार) : टेटवाली ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक विजय बांगर यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचे १५ व्या वित्त आयोगाच्या खात्यातील दिनांक तीन लाख २० हजार ९०४ रुपयांचा अपहार केल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले असल्याची तक्रार टेटवाली ग्रामपंचायतचे सरपंच ज्योती माढा व इतर सदस्यांनी लेखी स्वरूपात गट विकास अधिकारी विक्रमगड यांच्याकडे केली आहे.
याबाबत टेटवाली ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती माढा, उपसरपंच विजय काकड, सदस्य पांडुरंग भुरकुड यांनी विक्रमगड गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. ग्रामसेवकाने सौर पथदिवे बसवल्याचे बिल एका ठेकेदार व संस्थेस अदा केल्याची बाब सरपंच व सर्व सदस्यांच्या निदर्शनास आली; परंतु प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नसल्याने हे बिल का अदा केले, असा प्रश्न ग्रामसेवकांना केला. याबाबत ग्रामसेवकांकडून कोणतेही योग्य उत्तर न मिळाल्याने याची चौकशी व्हावी, याकरिता विक्रमगड बीडीओ यांना याविषयी लेखी तक्रार देण्यात आली.
----------------------
बीडीओंकडून प्रकरण प्रलंबित
गटविकास अधिकारी यांनी कोणतीही कारवाई न करिता फक्त कागदी घोडे नाचवत प्रकरण प्रलंबित ठेऊन उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. हा विषय वरिष्ठ कार्यालयात पाठवत असून मी कारवाई करू शकत नाही. वरिष्ठ कार्यालयाकडे जा, मला एकच काम नाही, असे उत्तर देऊन प्रकरण प्रलंबित ठेवले असल्याचा आरोप सरपंचांसह इतर सदस्यांनी केला आहे.
---------------
१५ व्या वित्त आयोगांतर्गत सौर पथदिवे न बसवता ग्रामसेवकाने ठेकेदार (संस्थेस) बिल अदा केले आहे. हे बिल काम न करता काढले असून या कामात भ्रष्टाचार झाला आहे. ग्रामसेवकाविरोधात आम्ही गटविकास अधिकारी यांच्याकडे पुराव्यासहीत लेखी तक्रार केली आहे; परंतु गटविकास अधिकारी ग्रामसेवकाला पाठीशी घालत आहेत. याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार आहोत.
- पांडुरंग भुरकुड, सदस्य, टेटवाली ग्रामपंचायत
-------------
१५ व्या वित्त आयोगात किंवा इतर कामात कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. आचारसंहिता असल्यामुळे काम होण्यासाठी थोडा उशीर झाला. काम येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल.
- विजय बांगर, ग्रामसेवक, टेटवाली ग्रामपंचायत
--------------
टेटवाली ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचारासंबंधी आलेल्या तक्रारीची चौकशी करण्यात आली आहे. याबाबत चौकशी अहवाल हा पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे.
- एम. एम. सपकाळे, ग्रामविस्तार अधिकारी, पंचायत समिती, विक्रमगड