
जागा उपलब्ध झाल्याने रखडलेले पाणी योजनेच्या कामाला सुरुवात
मनोर, ता. ११ (बातमीदार) : पालघर तालुक्यात दगड खाणींसाठी प्रसिद्ध नागझरी ग्रामपंचायतीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात ठेकेदाराला कार्यादेश दिल्यानंतर जागेअभावी पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले होते, पण उद्योजक किशोर अधिकारी यांनी जागा उपलब्ध करून दिल्याने पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. नागझरी गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत चार कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
चिल्हार बोईसर रस्त्यावरील सूर्या नदी किनाऱ्यापासून जवळच्या अंतरावर असताना नागझरी गावात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होत असते. घरोघरी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या, पण राजकीय पुढाऱ्यांचा श्रेयवाद आणि जागा उपलब्ध होत नसल्याने योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू झाले नव्हते. ही पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर प्रधानमंत्री जलजीवन मिशन योजनेंतर्गत तीन कोटी ४८ लाख रुपयांची योजना मंजूर झाली आहे. गावामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने कायमची सुटणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
सूर्या नदी पात्रातील पाणी तीन किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन टाकून शुद्धीकरण केंद्रात आणले जाणार आहे. ते प्रक्रिया केल्यानंतर हे पाणी साठवण टाकीद्वारे घराघरापर्यंत वितरित केले जाणार आहे, पण जागेअभावी योजनेचे काम सुरू झाले नाही. नागझरी गावातील उद्योजक किशोर प्रवीण अधिकारी यांनी त्यांच्या मालकीच्या जागेत विहीर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने नागझरी गावच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मंगळवारी वाढदिवसाचे निमित्त साधून किशोर अधिकारी यांनी गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी भूदान केले.
....
कामासाठी बारा महिन्यांची मुदत
नागझरी गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची तीन कोटी ४८ लाख रुपयांची निविदा तेरा टक्के जादा दराने मंजूर करण्यात आली आहे. यासाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश डी. के. गाढवे कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहेत. ठेकेदाराला योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी बारा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
.....
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर नागझरी, चरीच्या ग्रामस्थांची शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.
- सुदेश पाटील, उपसरपंच नागझरी.