केळवे जंजिरा किल्ला लाटामुळे ढासळतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळवे जंजिरा किल्ला लाटामुळे ढासळतोय
केळवे जंजिरा किल्ला लाटामुळे ढासळतोय

केळवे जंजिरा किल्ला लाटामुळे ढासळतोय

sakal_logo
By

पालघर, ता. ११ (बातमीदार) : केळवे पाणकोट जंजिरा किल्ला हा केळव्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत गेली ४५० वर्षे खंबीरपणे उभा आहे, पण आता केळवे जंजिरा किल्ला मात्र समुद्राच्या लाटांच्या माऱ्यामुळे ढासळत चालला आहे. केळव्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या किल्ल्याची दुरुस्ती करावी, यासाठी केळवे संवर्धन मोहिमेने भारतीय पुरातन विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच केळवे ग्रामपंचायतीकडेही दुरुस्तीसाठी साकडे घातले आहे.
ऊन-वारा पावसाचा मारा खात उभा असलेला केळवे जंजिरा किल्ला १० जानेवारी १७३९ रोजी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला. त्यानंतर पुढे या परिसरातील शिरगाव, तारापूर, डहाणू असे किल्ले जिंकले. तसेच वसईच्या लढाईत पोर्तुगीजांना मराठ्यांबरोबर तह करावा लागला आणि पुढे महाराष्ट्र सोडून जावे लागले, असा हा ऐतिहासिक महत्त्व असलेला केळवे जंजिरा किल्ला केळवे गावासोबत संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे. हा किल्ला समुद्रातील लाटांच्या माऱ्याने ढासळत चालला आहे. या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे व केळवे ग्रामपंचायतीकडे ही मागणीही दुर्गप्रेमींनी केली आहे.
केळवे जंजिरा संवर्धनाची जबाबदारी संवर्धन मोहीम केळवे व किल्ले वसई मोहीम संस्थामार्फत २००८ सालापासून राबविण्यात येत आहे. प्राथमिक स्वरूपातील पहिल्या मोहिमेत नकाशा बनविणे, इतिहास संकलन, मुख्य अवशेष स्वरूपातील वास्तूची मोजणी तटबंदीवरील झाडांची स्वच्छता असे उपक्रम राबविण्यात आले. मोहिमेत स्थानिकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने वसई किल्ला ते केळवे जंजिरा श्री वज्रेश्वरी देवी पालखीचे आयोजन करण्यात आले. या पालखी उत्सवात वसई मोहिमेंतर्गत धारातीर्थी पडलेल्या नरवीरांच्या गावांना देवीच्या पालखी उत्सवात मान देण्यात येतो. या ढासळत चाललेल्या किल्ल्याची डागडुजी करावी यासाठी केळवे संवर्धन मंडळ प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाचे योगेश पालेकर यांनी केले आहे.