देशाला सृजनाच्या दिशेने नेऊया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशाला सृजनाच्या दिशेने नेऊया
देशाला सृजनाच्या दिशेने नेऊया

देशाला सृजनाच्या दिशेने नेऊया

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : जगात आज पाचव्या स्थानावर असलेल्या भारताने भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला मोठा वारसा दिला आहे. भारताला सृजनाच्या दिशेने नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साह्य करू या, अशी भावनिक साद राजकीय विश्लेषक प्रा. संगीत रागी यांनी घातली. ठाण्यात आयोजित ३७ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे उद्‍घाटन प्रा. संगीत रागी यांच्या हस्ते सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानात झाले. त्यावेळी ‘आझादी का अमृत महोत्सव’ हे व्याख्यानमालेतील पहिले पुष्प त्यांनी गुंफले.
यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आणि सचिव शरद पुरोहित व्यासपीठावर उपस्थित होते. श्रोत्यांमध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजय देशमुख, माजी उपमहापौर सुभाष काळे, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, डॉ. राजेश मढवी, विद्याधर वैशंपायन, प्रा. कीर्ती आगाशे आदी मान्यवर उपस्थित होते. व्याख्यानात उपस्थितांना संबोधित करताना प्रा. रागी यांनी प्राचीन ते अर्वाचीन भारतातील स्थिती उलगडताना अखंड भारताच्या नकाशाचा उल्लेख करून विविध दाखले दिले. भारताला प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभली असून गुरु-शिष्याच्या परंपरेने भारत विशाल बनला आहे. वेद, उपनिषदे व शास्त्रांमुळे भारत जगात श्रेष्ठ आहे. तरीही स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांनंतर यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याकडे प्रा. रागी यांनी लक्ष वेधले.

.....................
श्रोत्यांनी उचलून धरलेली व्याख्यानमाला
रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे हे ३७ वे वर्ष असून आजचे हे २५३ वे व्याख्यान असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. पहिल्या व्याख्यानापासून रसिक श्रोत्यांनी ही व्याख्यानमाला उचलून धरली आहे. १९९४ साली माजी गव्हर्नर जगमोहन यांच्या व्याख्यानावेळी अचानक पाऊस आल्याने जागा बदलण्याची वेळ आली. तेव्हा सभागृहात व्याख्यान घ्यावे लागले. त्यालाही रसिकांची गर्दी उसळली, अक्षरशः जिन्याच्या पायऱ्यांवर बसून अनेकांनी व्याख्यानाचा आस्वाद लुटला. त्या काळात कडाक्याच्या थंडीतही श्रोते शाल पांघरून व्याख्यानाला येत असत, अशा आठवणी आमदार केळकर यांनी जागवल्या.