
गोवर लसीकरणाचा दुसरा टप्पा रविवारपासून
मुंबई, ता. ११ : राज्यातील गोवर उद्रेकाने प्रभावित भागात सर्वेक्षण आणि प्रतिसाद लसीकरण सुरू आहे. लसीकरण मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून पहिल्या टप्प्यात राज्यातील तीन लाखांहून अधिक बालकांना लस देण्यात आली. गोवर-रुबेला लसीकरणाचा दुसरा टप्पा येत्या १५ जानेवारीपासून सुरू केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनापर्यंत आपापल्या भागातील लसीकरणापासून वंचित नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना एम आर १ आणि २ डोस देण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.
जिल्हा आणि राज्य स्तरावर पुरेसा गोवर-रुबेला लस साठा, प्रत्येक संशयित गोवर रुग्णाला जीवनसत्त्व ‘अ’चे दोन डोस, समाजप्रबोधन - आरोग्य शिक्षण - स्थानिक प्रभावी व्यक्तींची मदत, मुंबई आणि राज्यातील उद्रेकग्रस्त भागात युनानी आणि खासगी डॉक्टरांच्या कार्यशाळेचे नियोजन आणि मौलाना अन् स्थानिक प्रभावी व्यक्तींच्या बैठकीचे नियोजन लसीकरण मोहिमेसाठी करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील गोवर-रुबेला लसीचा डोस चुकलेल्या प्रत्येक बालकाला दोन डोस २८ दिवसांच्या अंतराने देण्यात आले. २५ डिसेंबरपर्यंत राज्यात १४,९२० अतिरिक्त लसीकरण सत्रांचे आयोजन केले गेले होते. त्या अंतर्गत आतापर्यंत ६२,९४० बालकांना गोवर-रुबेला पहिला डोस देण्यात आला. ६१,५२७ बालकांना दुसरा डोस देण्यात आला. त्यासोबतच १,६२,२५३ बालकांना ‘व्हिटॅमिन ए’ची मात्रा देण्यात आली.
राज्याचे लसीकरण
- गोवर प्रभावित भागात एकूण कार्यरत सर्वेक्षण पथके ः १५०२
- आतापर्यंत सर्वेक्षण करण्यात आलेली घरे ः ३४,५८,१५३
- उद्रेकग्रस्त भागात गोवर-रुबेलाचा अतिरिक्त डोस देण्यासाठी शोधण्यात आलेली बालके ः ५,००,९१०
- अतिरिक्त डोस देण्यात आलेली बालके ः ३,००,८८२
राज्याची चार वर्षांची गोवर स्थिती
वर्ष एकूण उद्रेक संशयित रुग्ण निश्चित निदान झालेले रुग्ण मृत्यू
२०१९ ३ १३३७ १५३ ३ (मुंबई)
२०२० २ २१५० १९३ ३ (नागपूर, चंद्रपूर व अकोला पालिका)
२०२१ १ ३६६८ ९२ २ (ठाणे / मुंबई)
२०२२ १८५ २१८५२ १३९१ २५ (१६ मुंबई, ४ भिवंडी, ३ ठाणे आणि २ वसई-विरार)
२०२३ २ २६२ ३६ ०
गोवरमुळे झालेले ः मृत्यू २५
लस घेण्याचे आवाहन
- आतापर्यंत राज्यात एकूण २५ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यात १२ मुली आणि १३ मुलांचा समावेश होता. त्यांपैकी एका बालकाने गोवर लसीचा एक डोस घेतलेला आहे. इतरांनी लस घेतलेली नाही.
- सर्वाधिक मृत्यू मुंबईत नोंदवण्यात आले आहेत. नव्या वर्षात पुणे पालिका क्षेत्रात दोन उद्रेक नोंदवण्यात आले. त्यात एकूण २६ संशयित रुग्णांची नोंद झाली.
- मुंबई आणि इतर भागांत सध्या सुरू असलेल्या गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सर्व जनतेने आपल्या कुटुंबातील नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना गोवरची लस तातडीने द्यावी, असे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.