
चारोटीनाका येथे बसथांबा शेडची आवश्यकता
कासा, ता. १२ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्ग तसेच डहाणू-नाशिक राज्यमार्ग ज्या नाक्यावरून जात आहे, त्या चार रस्त्यावर प्रवाशांसाठी बसथांबा शेड बांधण्याची मागणी अनेक प्रवासी करीत आहेत.
चारोटी नाका येथे पूर्वी डहाणू-नाशिक राज्य मार्गावर दोन्ही बाजूस बस थांबा शेड होत्या; पण महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या कामात राज्यमार्गाचेदेखील रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे तेथे असलेल्या बसथांबा शेड तुटल्या. दहा ते बारा वर्षे झाली तरीही आजपर्यंत तेथे बस प्रवासी थांबा नसल्याने अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत. तरी तेथे बस थांबा शेड उभाराव्यात.
चारोटी नाका येथून आजूबाजूच्या गाव खेड्यातील नागरिक, शेतकरी, रुग्ण, शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थी डहाणू किंवा नाशिककडे जाण्यासाठी याच नाक्यावर उभे असतात. निवारा शेड नसल्यामुळे त्यांना ऊन, पावसाचा त्रास सहन करावा लागतो. त्यात रस्त्याच्या बाजूस रिक्षाथांबा असल्याने बसमध्ये चढताना, उतरताना अपघाताचा धोका सहन करावा लागतो. त्यासाठी बसथांबा शेडची अत्यंत गरज आहे. त्याचबरोबर महामार्गावरसुद्धा मुंबईकडे व गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांनासुद्धा अशा कुठल्याही प्रकारच्या बसथांब्याची उपलब्धता नसल्याने त्यांनासुद्धा उन्हातान्हात, पावसात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे येथे प्रवाशांसाठी प्रवास थांबा शेडची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
-------------
डहाणू किंवा नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना चारोटी नाका येथे कुठल्याही प्रकारची बसथांबा शेडची व्यवस्था नाही. ऊन पावसात त्रास सहन करत प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन येथे शेडची सुविधा करावी.
- सुदाम कदम, सदस्य, चारोटी ग्रामपंचायत
-----------------
पूर्वी चारोटी नाका येथे बसथांबे शेड होत्या; पण या रस्ता रुंदीकरणामुळे आणि अतिक्रमण झाल्यामुळे सध्या बसथांबे नाहीत. त्याबाबत आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून पुन्हा बसथांबा शेड उभारणार आहोत.
- भगवान तांडेल, सरपंच, चारोटी ग्रामपंचायत