कुडकुडत्या थंडीत पदपथावर मुक्काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडकुडत्या थंडीत पदपथावर मुक्काम
कुडकुडत्या थंडीत पदपथावर मुक्काम

कुडकुडत्या थंडीत पदपथावर मुक्काम

sakal_logo
By

वाशी, ता. ११ (बातमीदार) ः राज्यभर पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. नवी मुंबईतील ऐरोली पटणी कंपनी मैदानात ठाणे ग्रामीण पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू असून ग्रामीण भागातील उमेदवारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राज्यात गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली पोलिस भरती अखेर सुरू झाली आहे. त्यामुळे सैन्य दलात किंवा पोलिस दलात आपले नशीब आजमावणारी तरुणाई आता मैदानात उतरली आहे, पण पोलिस दलात सुरक्षित भविष्य बनवण्याच्या आशेने भावी पोलिस बनण्यासाठी आलेल्या उमेदवारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठाणे ग्रामीणची पटणी कंपनी मैदानात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना हा अनुभव येत आहे. यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून हजारो परीक्षार्थी दाखल झाले आहेत. ग्रामीण भागातून येणारे तरुण आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. तसेच ठाणे, मुंबईत नातेवाईक नसल्याने विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नसल्याने हाल होत आहेत. त्यामुळे अनेकांना पटणी मैदानाच्या बाजूला पालिकेने स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी मैदानाताच रात्र काढावी लागत आहे. त्यातच थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे या विद्यार्थ्यांना आरोग्याशी लढा देत पोलिस होण्याचे स्वप्न साकारण्यासाठीची अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे.
------------------------------
सरकारी नोकरीमुळे कल
कोरोनामुळे देशात मंदीचे सावट आहे. अनेक उद्योगधंद्यांना उतरती कळा लागली आहे. रोजगार गेल्याने बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनेक उच्च सुशिक्षित तरुण पोलिस भरतीकडे वळल्याचे दिसत आहे. बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना पोलिस शिपाई भरती आहे; पण पदवीधर, पदवीत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी देखील सरकारी नोकरी असल्यामुळे भरतीसाठी येत आहेत.
-------------------------
घरची परिस्थिती बेताची
पदवीपर्यंतचे शिक्षण झाले असून उस्मानाबाद या ठिकाणाहून आलो आहे. गावाला शेती करून शिक्षण पूर्ण केले आहे. घरची परिस्थिती हालाख्याची असल्यामुळे लॉजिंगमध्ये राहणे परवडत नाही. त्यामुळे पदपथावर रात्र काढणार असल्याचे उस्मानाबाद येथून आलेल्या परीक्षार्थीने सांगितले.