कौटुंबिक वादातून तरुणाचे ब्लेडने गुप्तांग छाटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौटुंबिक वादातून तरुणाचे ब्लेडने गुप्तांग छाटले
कौटुंबिक वादातून तरुणाचे ब्लेडने गुप्तांग छाटले

कौटुंबिक वादातून तरुणाचे ब्लेडने गुप्तांग छाटले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणातून तिघांनी मिळून ब्लेडने एका तरुणाचे गुप्तांग छाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जखमी संजयकुमार राम (वय ३९) याच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल होताच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करणारे सोनुकुमार राम (वय ३२), करण राम (वय २८), सुरेंद्रकुमार राम (वय ३५) आणि संजयकुमार राम हे चौघे कामगार कल्याण पूर्वेतील गोळवली येथील शंकर शेठ चाळीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून राहण्यास आहेत. सोनुकुमार व संजयकुमार यांच्यात कौटुंबिक वाद होते. या वादातून संजयकुमारचा काटा काढण्याचा विचार सोनुकुमारच्या डोक्यात होता. मंगळवारी (ता. १०) रात्री त्यांनी घरी मेजवानीचा बेत आखला. सर्वांनी एकत्रित जेवण केल्यानंतर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मद्यपान केले. त्यानंतर सोनुकुमार व सुरेंद्रकुमार यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. सोनु, करण व सुरेंद्र यांनी संजयला मारहाण केली. त्यानंतर सोनुकुमारने ब्लेडने संजयकुमारचे गुप्तांग कापले.

आरोपींनीच रुग्णालयात नेले
संजयकुमारच्या शरीरातून खूप रक्तस्राव झाल्याने आरोपींनी त्याला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. संजयकुमारच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली.