लुटुपटूच्या भाजीमंडईत खरेखुरे व्यवहारज्ञान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लुटुपटूच्या भाजीमंडईत खरेखुरे व्यवहारज्ञान
लुटुपटूच्या भाजीमंडईत खरेखुरे व्यवहारज्ञान

लुटुपटूच्या भाजीमंडईत खरेखुरे व्यवहारज्ञान

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ११ : ‘भाजी घ्या हो, भाजी... ताजी ताजी भाजी...’ हे गीत अनेकांनी ऐकलेले आहे. मात्र या गाण्यातले छोटेसे भाजीवाले डोंबिवलीत प्रत्यक्षात भाजी विकत होते. टिळकनगर बालक मंदिरने बुधवारी राबवलेल्या ‘किलबिल भाजी मंडई’त बुधवारी शाळेतील चिमुकले भाजी विकत होते.
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या टिळकनगर बालक मंदिरने आयोजित केलेल्या या उपक्रमात बालकवर्गाची, म्हणजे साधारण पाच ते सहा वर्षे या वयोगटातील लहान मुले सहभागी झाली होती. ‘भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी’ पालक, मेथी दहा रुपये जुडी, कोबी, टोमॅटो, प्लॉवर घ्या. वांगी, काकडी ताजी ताजी लवकर घ्या हो आजी... अशी आरोळी देत ही मुले ग्राहकांना आकर्षित करत होती. बच्चे कंपनीचा हा किलबिलाट आपण खऱ्याखुऱ्या भाजीमंडईत गेल्याची अनुभूती देत होता.
खेळण्यापुरती मर्यादित असलेली भाजी विक्रेत्याची भूमिका प्रत्यक्षात करायला मिळाल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. आपल्या लहानग्या हातांनी हा सगळा भाजीविक्रीचा व्यवहार करताना एक विलक्षण तेज, चपळता आणि हिरव्यागार भाजीइतकाच टवटवीतपणा, उत्साह मुलांमध्ये होता. या बाल भाजी विक्रेत्यांचे ग्राहक बनले होते ते याच विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक! ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यात आला. सकाळी भाजी मागवण्यात आली आणि ती सहभागी विद्यार्थ्यांना देण्यात आली. भाजी विकताना, पैशांचा हिशोब करताना मुलांचा गोंधळ उडत होता, त्यासाठी त्यांच्या आईने त्यांना मदत केली. अर्थात हे व्यवहारज्ञान मुलांना मिळावे म्हणूनच हा उपक्रम राबवण्यात आला होता. मुलेही आपल्या परीने हिशोब करून उत्तम भूमिका निभावत होती. या उपक्रमातून जमा झालेले पैसे भाजी पुरवठादाराला देण्यात आले.
सायली गोखले, रश्मी देवचके, सुनिता जोशी, ऋचा व्यापारी, जागृती उपाध्ये या शिक्षकांनी विभाग प्रमुख स्वाती कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन केले. त्यांना सेविका रोहिणी मेस्त्री आणि कुंदा शिंदे यांनी साह्य केले.
.......................

गेल्या दोन वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. मुलांना व्यवहारज्ञान मिळावे, तसेच पालेभाज्या-फळभाज्या यातला फरक आणि आहारातील महत्त्व समजावण्याचा प्रयत्न यातून केला जातो. एखादी भाजी खाण्याचा आग्रह पालक मुलांना करतात; तेव्हा पैसे देऊनही भाजी विकत आणलेली आहे, ती वाया घालवता कामा नये, याची जाणीव अशा उपक्रमांतून मुलांमध्ये निर्माण होते. पालकांचाही याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
- स्वाती कुळकर्णी, बालविभाग प्रमुख