
वसतिगृहातील सौर उर्जा प्रकल्प बंद
नेरळ, ता. १२ (बातमीदार) ः तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. कर्जत तालुक्यात पहाटेच्या वेळी तापमान १५ अंश सेल्सिअस इतके आहे. अशातच शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात मुलींना थंड पाण्याने आंघोळ करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
वसतिगृहात गरम पाण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी यंत्रणा दीड वर्षापासून बंद आहे. त्यामुळे ऐन थंडीत मुलींवर थंड पाण्याने आंघोळ करण्याची वेळ आली आहे. हा प्रकार समजल्यानंतर आदिवासी बांधवांकडून संताप व्यक्त होत आहे.
नेरळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला लागून महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभागाचे, मुलींसाठी वसतिगृह बांधले आहे. वसतिगृहात वर्षभरापासून ४७ विद्यार्थिनी राहत आहेत. आदिवासी मुलींना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी वसतिगृह उभारण्यात आले असून गरम पाण्यासाठी लाखो रुपये खर्चून सौरऊर्जेवर चालणारी यंत्रणा बसवली आहे. मात्र ही यंत्रणा अनेक दिवसांपासून बंद असल्याने मुलींची गैरसोय होत आहे. याबाबत वसतिगृहाच्या मुख्य अधिकारी एस. एस. झोहरे यांच्याशी संपर्क साधला असता, पेण येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने वसतिगृहाचे काम केले होते. त्यांच्या अंदाजपत्रकात सौरऊर्जा प्रकल्पाचा समावेश होता. त्यामुळे नव्याने खर्च करणे शक्य नाही. त्याच्या दुरुस्तीबाबत सूचना करण्यात येईल.
- शशिकला अहिरराव, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास, पेण
आदिवासी मुलींसाठी वसतिगृह व्हावे, यात कातकरी समाजालाही आरक्षण असावे यासाठी आंदोलन केले होते. आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना राबवते. वसतिगृहासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून त्यातील यंत्रणा कार्यान्वित नसेल आणि त्याचा त्रास मुलींना होत असेल तर ते चुकीचे आहे. याबाबत त्वरित कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
- राहुल मुकणे, आदिवासी कार्यकर्ते