नगर परिषदेवर २६ गावांच्या पाणीपट्टीचा भार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगर परिषदेवर २६ गावांच्या पाणीपट्टीचा भार
नगर परिषदेवर २६ गावांच्या पाणीपट्टीचा भार

नगर परिषदेवर २६ गावांच्या पाणीपट्टीचा भार

sakal_logo
By

पालघर, ता. १२ (बातमीदार) : पालघर नगर परिषदेसह २६ गावांच्या नळपाणी योजनेमध्ये समाविष्ट गावाकडून पाणी बिलापोटी साडेसात कोटी रुपयांची थकबाकी राहिली आहे. त्यामुळे नगरपरिषदेने पाणीपुरवठा खंडित केला आहे. शिवाय बिलाच्या थकबाकीचा भार नगरपरिषदेवर असला, तरी तो पालघरमधील नागरिकांवर पडणार आहे. यासाठी पालघरमधील पाणीपुरवठ्याची योजना स्वतंत्र करावी, अशी येथील नागरिकांकडून मागणी होत आहे.
पालघर ग्रामपंचायतासह २६ गावांच्या नळपाणी योजनेला २००९ मध्ये सुरुवात झाल्यानंतर २०११ पासून ही योजना पालघर नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आली. या योजनेसाठी लागणारा विद्युत खर्च व इतर शुद्धीकरण खर्चाची रक्कम संबंधित गावातर्फे भरण्यात आली नसल्याने एकंदर साडेसात कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. दर महिन्याला २५ लाख रुपये वीजबिल या नळपाणी योजनेसाठी येत असून नगर परिषदेकडे निधी उपलब्ध नसल्याने वीजबिलाचा भरणा करणे नगरपरिषदेला कठीण झाले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने योजना उभारून २०११ मध्ये नगर परिषदेकडे हस्तांतरित केली. गेल्या १३ वर्षांपासून या ठिकाणी पाणीपुरवठा होत असला, तरी प्रत्यक्षात कोणत्याही गावाला किती पाणी वितरित झाले व किती दाबाने पाणी मिळते त्याचे मोजमाप करणारी यंत्रणा अजूनही कार्यान्वित झालेली नाही.

-----------------
शहरामध्ये १४ रुपये प्रतिघनमीटर आकारणी
योजनेतून दररोज १२ दशलक्ष पाणी सूर्या नदीच्या पात्रातून उचलले जाते. त्यापैकी निम्मे पाणी पालघर शहरासह जिल्हा मुख्यालयाला; तर उर्वरित पाणी हे २६ गावाला पुरवले जात आहे. पालघर नगर परिषद शहरामध्ये नागरिकांना १४ रुपये प्रतिघनमीटर इतकी दर आकारणी होत असते. ग्रामीण भागात नागरिकांना ५.६० रुपये प्रतिघनमीटर इतकी दर आकारणी होत आहे. आज पालघर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकाला जादा भावाने पाणी खरेदी करावे लागत आहे. त्यातच ग्रामपंचायतीकडून पाणीबिल वसूल करून भरणा केला जात नसल्याने थकबाकीची रक्कम वाढत चालली आहे.

-----------------
जिल्हा मुख्यालयाचे ४ लाख थकित
जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा पोलिस अधीक्षक या कार्यालयांना पालघर नगर परिषदेतर्फे पाणीपुरवठा केला जातो; मात्र या तिन्ही कार्यालयांना पाण्याची बिले पाठवूनही या तिन्ही कार्यालयाकडून पाणीपट्टी भरली जात नाही. आतापर्यंतची या तिन्ही कार्यालयाची थकबाकी चार लाख रुपये आहे. जिल्हा अधिकारी कार्यालय १ लाख ४८ हजार २८४ रुपये, जिल्हा परिषद कार्यालय २ लाख १४ हजार ९७४ रुपये; तर पोलिस अधीक्षक कार्यालय ५३ हजार १०९ रुपये अशी एकूण ४ लाख १६ हजार ३६७ रुपये पाणीपट्टी येणे बाकी आहे. वारंवार मागणी करून ही पाणीपट्टी भरली पाणी बिले संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज पाटील पवार यांनी सांगितले

-------------------
साडेसात कोटीच्या थकबाकीचा खर्च नगरपरिषदेला पेलवत नसल्याने या गावातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता; मात्र ओरड झाल्यानंतर नोटीस देऊन दहा दिवसात थकबाकी भरावी, असा आदेश दिला आहे. जिल्हाधिकारी संकुलाला नगरपरिषदेतर्फे पाणीपुरवठा केला जातो; मात्र नगरपरिषदेने जिल्हा संकुलाला पाण्याचे बिल दिले असूनही त्यांनी पाणीबिल भरलेले नाही. पाणीपुरवठ्याची सर्व जबाबदारी नगरपरिषदेवर पडलेली आहे.
- डॉ. उज्ज्वला काळे, नगराध्यक्ष, पालघर नगरपरिषद