अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेस मुंबईमध्ये उत्साहात प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेस मुंबईमध्ये उत्साहात प्रारंभ
अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेस मुंबईमध्ये उत्साहात प्रारंभ

अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेस मुंबईमध्ये उत्साहात प्रारंभ

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. १२ (बातमीदार) ः द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने सलग अकराव्या वर्षी अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन ११ ते १३ जानेवारीदरम्‍यान करण्यात आले आहे. हिंदू जिमखान्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत ‘सियाराम ब्लाइंड क्रिकेट कप’चा उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी सियाराम ग्रुपचे अध्यक्ष रमेश पोतदार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद रेगे उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, पंजाब, दिल्ली हे आठ संघ सहभागी झाले असून या स्पर्धा लीग बेसिसवर होणार असल्याची माहिती संस्थेचे अर्जुन मुद्दा यांनी दिली; तर रमेश पोतदार यांनीदेखील या स्पर्धांना भविष्यातदेखील आपण एका विशिष्ट उंचीवर नेऊ अशी ग्वाही दिली.

पहिल्‍या दिवशीचे सामने
हिंदू जिमखान्यावर महाराष्ट्र व दिल्ली संघांत सलामीचा सामना झाला. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करून चार बाद २४० धावा केल्‍या. यामध्‍ये हितेश भोजने याच्या ११० धावांचा समावेश होता; तर दुसरा सामना कर्नाटक व मध्य प्रदेश या संघांत झाला.
कर्नाटकने टॉस जिंकून मध्य प्रदेशने पहिली फलंदाजी केली. मध्य प्रदेशने ९ बाद ९४ धावांचे छोटेसे लक्ष्य कर्नाटकसमोर ठेवले, परंतु कर्नाटक संघाने बिन बाद ९५ धावा अवघ्या ५ शतकांत करून हा सामना आपल्या खिशात घातला.
ब गटात पहिला सामना गुजरात व पंजाब संघांदरम्‍यान झाला. गुजरातने प्रथम फलंदाजी करून बिन बाद २५९ धावांचे विशाल लक्ष्य पंजाब संघासमोर ठेवले. यामध्ये हितेश पटेल १३६ धावा व सुभाष बोहिया ८२ धावांचा समावेश होता. त्‍यांनी पंजाब संघाला अवघ्या ६३ धावांवर रोखून गुजरातने सलामीचा सामना आपल्या खिशात घातला. दुसरा सामना गोवा व राजस्थान या संघांत झाला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करून १२ षटकांत दोन बाद ९९ धावांचे लक्ष्य ठेवले; मात्र गोव्याने बिन बाद १०० धावा अवघ्या ५ षटकांत पूर्ण केल्या. ज्यात हनुमान वावळे याच्या ६७ धावांचा समावेश होता.
एकंदरीतच पहिल्या दिवसाच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व गुजरात हे संघ विजयी झाले. स्पर्धा यशस्वी होण्याकरिता अध्यक्ष अरुण भारस्कर, खजिनदार विजय डबे, अर्जुन मुद्दा, रेचल शिरसाट व सियाराम ग्रुप यांनी विशेष परिश्रम घेतले.