सिडको उद्यानात गैरप्रकारांना उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडको उद्यानात गैरप्रकारांना उधाण
सिडको उद्यानात गैरप्रकारांना उधाण

सिडको उद्यानात गैरप्रकारांना उधाण

sakal_logo
By

वाशी, ता. १२ (बातमीदार) ः शहराचा शिल्पकार असा गवगवा करणाऱ्या सिडकोला स्वतः बांधलेल्या उद्यानांमध्येही सोयी-सुविधा पुरवण्यात जरासाही रस नसल्याचे दिसून येत आहे. वाशी सेंटर वन परिसरातील उद्यान याच अनास्थेचे बळी ठरले असून लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या उद्यानात मद्यपी, गर्दुल्ल्यांचा असलेल्या वावरामुळे गैरप्रकारांना उधाण आले आहे.
वाशीतील गजबलेला परिसर म्हणून सेंटर वनचा परिसर ओळखला जातो. या परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या बाहेरील नागरिकांच्या विसाव्यासाठी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सिडकोने उद्यान उभारले आहे. मात्र या उद्यानामध्ये सध्या विविध गैरप्रकारांना उधाण आले आहे. या उद्यानामध्ये सुरक्षा रक्षक नसल्याने मानखुर्द, गोवंडी अशी शहराबाहेरील गर्दुल्ल्यांच्या टोळ्या उद्यानांमध्ये ठाण मांडून बसलेल्या आहेत. वाशी आणि परिसरामध्ये असणारे महाविद्यालयीन तरुण भरदिवसाही येथे पार्टी करत असतात. विशेष म्हणजे, या उद्यानासाठी नेमलेले सुरक्षा रक्षक आणि सफाई कामगार आठवड्यातून एकदाच या ठिकाणी येत असल्यामुळे गैरप्रकारांना खतपाणी मिळत आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या उद्यानाच्या मूळ संकल्पनेलाच तडा गेला आहे.
-----------------------------------------------------
लाखो रुपयांचा खर्च वाया
या उद्यानात ज्येष्ठ नागरिकांकरिता ग्रीन लॅान उभारण्यात आले होते. मात्र, पावसाळ्यात उगवलेली झाडे सिडकोकडून अद्याप छाटण्यात आलेली नसल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. उद्यानातील विद्युत रोषणाईचे दिवे पण अनेक वर्षापासून बंद आहेत. तसेच नागरिकांसाठी बनवलेल्या अॅम्पीथिएटरसाठीची आसनव्यवस्था ही जीर्ण झाली आहे.
--------------------------------------------------------
पोलिसांकडून कारवाईकडे कानाडोळा
वाशी पोलिसांना या ठिकाणी अनेक गैरप्रकार सुरू असल्याचे रिक्षावाले व इतर दक्ष नागरिक फोन करून माहिती देतात. मात्र, पोलिस या ठिकाणी फिरकतच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कायद्याच्या रक्षकांचा काही धाकच नसल्याने शहरासाठी भूषणावह असणारे हे उद्यान मद्यपी, गर्दुल्लांचा अड्डा बनले आहे.
-------------------------------------------------------
वादामुळे ‘पे ॲण्ड पार्किंग’धूळ खात
सिडकोने वाशी परिसरात येणाऱ्या वाहनचालकांना वाहने पार्किंग करण्यासाठी या ठिकाणी वाहनतळ उभारले आहेत. परंतु तुंगा हॉटेल रेजन्सी आणि सिडको यांच्यातील वाद न्यायालयात गेल्याने पार्किंगसाठी उभारण्यात आलेल्या वाहनतळाची इमारत जीर्ण झाली आहे.