पालिकेचा अर्धवट कारभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेचा अर्धवट कारभार
पालिकेचा अर्धवट कारभार

पालिकेचा अर्धवट कारभार

sakal_logo
By

कांदिवली, ता. १२ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम-पूर्व जोडणाऱ्या हुतात्मा राजगुरू उड्डाण पुलाच्या कोपऱ्यावर, एस. व्ही. रोडला जोडणाऱ्या चौकाचे काम गेले तीन आठवडे बंद आहे. नूतनीकरण कामात खोदून ठेवण्यात आलेल्या मातीच्या रस्त्यावरच ढिगारे टाकून ठेवले आहेत. तसेच लोखंडी बॅरिकेट्स धोकादायक पद्धतीने लावल्याने येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेने अर्धवट थांबविलेले काम तातडीने पूर्ण करून दिलासा द्यावा, अशी मागणी वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.
कांदिवली पश्चिमेला स्वामी विवेकानंद मार्गावर हुतात्मा राजगुरू उड्डाण पुलाच्या सिग्नल चौकाचे सुशोभिकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. पालिकेने या कामात खोदकामात निघालेल्या दगड-मातीचे ढिगारे रस्त्याच्या आजूबाजूला टाकले आहेत. धोकादायक बाब म्हणजे बाजूला सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेट रस्‍त्‍याच् ‍याबाजूने कलंडले असून त्‍यामुळे धोका अधिक वाढला आहे. गेले तीन आठवडे ही धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वेकडून उड्डाण पुलावरून पश्चिमेला एस. व्ही. रोडवर उजवीकडे वळण घेताना रस्त्याच्या दिशेने आडवा असणारा बॅरिकेट लागून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाहनचालकांसह प्रवाशांना या ठिकाणावरून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. असे असूनही पालिकेकडून दुर्लक्ष झाल्याने आणि काम अर्धवट ठेवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

सुशोभिकरण आराखड्यात काही तांत्रिक अडचणी असल्याने काम थांबले आहे. मात्र दोन-तीन दिवसांत कामाला गती मिळेल.
- शुभम होळकुंडे, अभियंता, आर दक्षिण, देखभाल विभाग.