
पादचाऱ्यांनीही नियमाचे पालन करावे ः भोईर
कल्याण, ता. १२ (बातमीदार) : रस्त्यावर अपघात झाला की वाहनचालकाला दोषी समजले जाते. मात्र रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांनीही वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत, असे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याणमधील कार्यक्रमात केले. कल्याण पश्चिम वाहतूक पोलिस विभागामार्फत ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियानाला गुरुवारी (ता. १२) सुरुवात झाली.
कल्याण शहर वाहतूक शाखेतर्फे आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन आमदार विश्वनाथ भोईर, डीसीपी सचिन गुंजाळ, कल्याण आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, आयुष हॉस्पिटलचे डॉ. राजेश राजू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. एसीपी मंदार धर्माधिकारी, कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. ज्यामध्ये नेत्र तपासणी, रक्त तपासणी, मधुमेह, रक्तदाब आदी विकारांची यावेळी तपासणी करण्यात आली.
कर्तव्य बजावताना आपला हात गमावलेल्या ट्रॅफिक वॉर्डन सत्यजित गायकवाड यांना या कार्यक्रमात आर्थिक मदत देऊन सत्कारही करण्यात आला. तसेच कर्तव्यावर असताना विविध गुन्ह्यांतील चोरीची वाहने पकडून देणाऱ्या वाहतूक पोलिसांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. आगामी दोन वर्षांत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत रस्ते आणि प्रमुख रस्ते सिमेंटचे होणार असून रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन या वेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले.