
वृद्ध महिलेच्या हृदय विकारावर यशस्वी उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : एका ७० वर्षीय महिलेवर हृदयाशी संबंधित गंभीर आजारावर उपचार करून तिला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. कुमुदिनी असे या महिलेचे नाव असून, त्यांना बोरिवलीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांच्या तीन प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे आढळून आले. पुढील तपासासाठी इकोकार्डियोग्राम करण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या हृदयाच्या कार्यात अडथळा येत असल्याचे दिसून आल्याने त्यांना मिरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कुमुदिनी यांच्या फुप्फुसातील कार्य बिघडल्याने छाती विकारतज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी त्यांचे मूल्यमापन केले. कार्डिओथोरॅसिक व्हॅस्कुलर सर्जन डॉ. मयुरेश प्रधान, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कुमुदिनी यांच्या विविध आरोग्य समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एकत्र आली. डॉ. प्रधान यांनी सांगितले, डॉ. अनुप तासंडे, हृदयरोगतज्ज्ञ यांनी त्यांच्या हृदयाचे मूल्यांकन केले. त्यानंतर त्यांची अंतर्गत कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी करण्यात आली. डॉ. अनिकेत मुळे यांनी अनियंत्रित मधुमेहावरील उपचार केले. डॉ. केदार पोटे, कार्डियाक ॲनेस्थेटिस्ट यांनी रुग्णाला शस्त्रक्रियेपूर्वी भूल देत महत्त्वाची भूमिका बजावली. या रुग्णावरील बायपास शस्त्रक्रिया अतिजोखमीची आणि गुंतागुंतीची होती, असे डॉक्टरांनी सांगितले.
आयसीयूमध्ये त्यांना आतड्यांसंबंधी समस्या निर्माण झाल्या. लॅप्रोस्कोपिक आणि जनरल सर्जन यांनी रुग्णाचे व्यवस्थापन केले. शस्त्रक्रियेनंतरच्या कालावधीत त्यांच्या मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यात आले आणि हृदय व मज्जातंतूंच्या समस्यांसाठी डॉ. अनुप आणि डॉ. संगीता यांच्याकडून नियमित निरीक्षण करण्यात आले.