
मुंबईतील दूसरे यशस्वी अवयवदान
परदेशी ब्रेनडेड महिलेच्या
सात अवयवांचे दान
अनेकांचे प्राण वाचवण्यात यश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : एका ६७ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या अवयवदानातून अनेकांचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे. संबंधित महिला स्पॅनिश असून आपल्या मैत्रिणींसोबत ती भारतात आली होती. तिला स्ट्रोक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतरही तिची प्रकृती सुधारत नसल्याने डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले.
मुंबईतील या वर्षीचे हे दुसरे अवयवदान पार पडले आहे. एका परदेशी व्यक्तीचे मुंबईत अवयवदान होण्याची ही दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा एका नेपाळी महिलेने २०१९ मध्ये अवयवदान केले होते.
संबंधित महिला पर्यटनासाठी मुंबईत आली होती. तिच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. तिने आपल्या दोन्ही मुलांना मुंबईत बोलावून घेतले होते. प्रकृती सुधारत नसल्याने डॉक्टरांनी तिला ११ जानेवारी रोजी ब्रेनडेड घोषित केले. डॉक्टर आणि समुपदेशकांनी दोन्ही मुलांचे अवयवदानाबाबत समुपदेशन केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलांनी महिलेचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिचे सात अवयव दान करण्यात आले. ‘झेडटीसीसी’ने दिलेल्या माहितीनुसार महिलेचे हृदय, फुप्फुस, यकृत, दोन्ही मूत्रपिंडे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हाडे दान करण्यात आली आहेत. तिच्या अवयवदानातून आतापर्यंत चार रुग्णांचे प्राण वाचवले गेले आहेत. फुप्फुस, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडे प्रतीक्षा यादीत असलेल्या रुग्णांना देण्यात आली. हृदय लेबननमधील एका रुग्णाला देण्यात आले. हाडांचे टिश्यू आणि टेंड्सही दान करण्यात आले आहेत.