
रुग्णालयाच्या बहाण्याने ५६ लाखांची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ ः कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी परिसरात अंजली रुग्णालय चालू करत असल्याचे सांगत तिघा भामट्यांनी मेडिकल व्यावसायिकासह गुंतवणूकदारांची तब्बल ५६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात कल्पना भौमिक, भीमकुमार साव ऊर्फ अमित सावरा आणि नीलेश कळसाईत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
नवी मुंबई येथे राहणारे मेडिकल व्यावसायिक वग्ताराम भाटी (वय ४३) यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत ही फसवणूक झाली आहे. तिघा भामट्यांनी संगनमत करत वग्ताराम यांना कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी येथे अंजली रुग्णालय सुरू करत असल्याची थाप मारून तेथे मेडिकल दुकान चालू करण्यासाठी वग्ताराम व त्यांचे पार्टनर धनाराम सोळंकी यांच्याकडून ३० लाख रुपयांची डिपॉझिट रक्कम चेकद्वारे व दोन लाख रुपये रुग्णालयाचे साहित्य खरेदी करण्यासाठी घेतले. तसेच साक्षीदार समिधा पालव व त्यांचे आरोग्य हेल्थ केअर कंपनीचे पार्टनर यांच्याकडून लॅब सुरू करण्यासाठी डिपॉझिट म्हणून २४ लाख रुपये घेतले. दोन वर्षांनंतर रुग्णालय चालत नसल्याचे कारण देत ते बंद केल्याचे भासवले. गुंतवणूकदारांचे पैसे सहा महिन्यांत परत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले, परंतु वर्षाचा कालावधी उलटला तरी पैसे परत देत नसल्याने गुंतवणूकदारांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. वग्ताराम यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक डी. ए. सूर्यवंशी करत आहेत.