वाहतूक कोंडी फोडण्यासाठी डबल डेकर टनेलची गरज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी
डबल डेकर टनेलची गरज!
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी डबल डेकर टनेलची गरज!

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी डबल डेकर टनेलची गरज!

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : वाहतूक कोंडीतून सामान्य मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा आढावा घेतला. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी डबल डेकर टनेल आवश्यक असून हा पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी बैठक घ्यावी तसेच त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले.
मुंबईतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक प्रणालीवर भर देण्यासह वाहतुकीचे विविध पर्याय अवलंबले जात आहेत. त्यातच एकात्मिक वाहतूक प्रणालीच्या माध्यमातूनही वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महापालिका, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या वेळी एमएमआरडीए क्षेत्र एकात्मिक वाहतूक प्रणालीद्वारे जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मुंबईसाठी मल्टिडेक टनेल काळाची गरज असून त्याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी तांत्रिक टीमसोबत बैठक घेऊन या एकात्मिक वाहतूक प्रणालीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
---
सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य
वर्षा निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या या बैठकीत मुंबईतील वाढती वाहतूक आणि त्यावरील उपाय, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. एकात्मिक वाहतूक प्रणाली टनेलच्या माध्यमातून साकारण्याबाबत चर्चा करण्यात आली. या संकल्पनेच्या अनुषंगाने या वेळी सादरीकरण करण्यात आले.