
अपहृत दोन वर्षीय मुलीची तीन महिन्यांनी सुटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : वांद्रे रेल्वेस्थानकाजवळील स्कायवॉकवरून ऑक्टोबरमध्ये अपहरण झालेल्या दोनवर्षीय चिमुकलीची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथून मुलीचा शोध घेत पोलिसांनी असिफ अली शेख याला अटक केली आहे. असिफने मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिच्या पालकांकडून घेतले होते. मुलीचे आई-वडील असिफच्या परिचयाचे होते. बराच वेळ झाला तरी दोघे परतले नसल्याने मुलीच्या आईने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार केली. तेव्हापासून पोलिस मुलीचा शोध घेत होते. वांद्रे पोलिसांनी दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरिद्वार, पाटणा, मालदा आणि हावडा येथे मुलीचा शोध घेतला. त्यानंतर गुप्त माहितीदारांकडून असिफ सिलीगुडी येथील त्याच्या घरी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत असिफला अटक करत मुलीची सुटका केली.