
मेट्रो-७, २ अ मुंबईकरांना वरदान ठरेल
मुंबई, ता. १२ : मेट्रो मार्ग ७ आणि २ अची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २ अ (टप्पा-२) चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारीला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी परिसरातील गुंदवली स्थानकात भेट देऊन लोकार्पण सोहळ्याची तसेच तेथील सुविधांची पाहणी केली.
या वेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की मेट्रो ७ आणि २ अचा ३५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. यातील ३३ स्थानके नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. हा टप्पा लोकांच्या सेवेत येण्याने अंधेरी, दहिसर, वर्सोवा या परिसरातील नागरिकांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल. रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. त्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते झाले होते, हा एक मोठा योगायोग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मेट्रो प्रकल्प हा लाखो लोकांना दिलासा देणारा आहे. त्यामुळे नागरिकांना आरामदायी प्रवास करणे शक्य होणार आहे.
मुंबईमध्ये आम्ही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. रखडलेले हे प्रकल्प आम्ही वेगाने मार्गी लावले आहेत. त्यातील काही प्रकल्पांचे मग ते काँक्रीटचे रस्ते, एसटीपी प्लांट, आरोग्याचे विषय, सुशोभीकरण अशा गोष्टी असतील, त्यांचेही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. ही मुंबईकरांसाठी एक मोठी भेट ठरेल, असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले
.