
वसई-विरारमधील प्रलंबित कामे मार्गी लावा
विरार, ता. १४ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका क्षेत्र व पालघर जिल्ह्यातील प्रलंबित विविध विकासकामे मार्गी लावण्याच्या व तातडीने सोडवण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. शहरातील विविध समस्यांच्या अनुषंगाने भाजप जिल्हाध्यक्ष राजन नाईक, शिवसेना जिल्हाध्यक्ष नीलेश तेंडोलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली होती. या भेटीनंतर लागलीच मुख्यमंत्र्यांनी आयुक्त अनिलकुमार पवार व जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना तातडीने सूचना केल्या आहेत.
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील अनेक विकासकामे मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. ही कामे झाल्यास शहरवासीयांची समस्यांतून सुटका होणार आहे. यात पाणी, रस्ते आणि शहर सौंदर्यीकरणासोबतच अन्य कामांचा समावेश आहे. यातील काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असली, तरी ती तातडीने होणे अपेक्षित आहेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
सोबत वसई-विरारकरांना भेडसावणाऱ्या अन्य समस्यांही तातडीने सोडवण्यात याव्यात, अशी मागणी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीत भाजप जिल्हाध्यक्ष राजन नाईक, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर यांनी केली होती. या मागण्यांचे निवेदनही या वेळी मुख्यमंत्र्यांना दिले होते. याप्रसंगी त्यांनी पालघर जिल्ह्यातील अन्य प्रलंबित कामांकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.