शाळांमध्ये फुलते परसबाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळांमध्ये फुलते परसबाग
शाळांमध्ये फुलते परसबाग

शाळांमध्ये फुलते परसबाग

sakal_logo
By

प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १८ : शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे. कुषोषणावर मात करता यावी. लहान वयातच मुलांना पोषणयुक्त आहाराची सवय लागावी. मुलांच्या शाळेतील आहारात ‎भाज्यांचा वापर करता यावा, यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच परसबाग तयार करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील दोन हजार १२८ शाळांच्या आवारात परसबाग फुलल्या आहे. शिक्षणाबरोबरच शालेयस्तरावर कृषी शिक्षण देण्याचा प्रयत्न रायगड जिल्हा परिषदेने केले आहे. विद्यार्थ्यांनी पिकवलेला भाजीपाला, फळे शालेय पोषण आहारात समाविष्ट केला जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भौगोलिक ज्ञानही प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन हजार १२८ शाळांमध्ये परसबागा तयार करण्यात आल्या आहेत. या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, पालक व शिक्षक यांचेदेखील योगदान मिळाले आहे. घराशेजारी मोकळ्या जागेत परसबाग निर्मितीला रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाने चालना दिली आहेत. आता कृषी विभागाने शाळेच्या आवारातही परसबाग तयार करण्याला चालना दिली आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. परसबागेच्या माध्यमातून वेगवेगळ्या भाज्यांची, फळे, फुलांची ओळख विद्यार्थ्यांना होऊ लागली आहे.
मोबाईल व ऑनलाईनच्या जगतामध्ये वावरणाऱ्या या विद्यार्थ्यांना निसर्गाशी एकरूप होण्याची सवय लागल्याने कृषीचे महत्त्व शालेय स्तरापासूनच त्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. विशेष म्हणजे, याच परसबागेतील‎ भाजीपाला विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात‎ दिला जाणार आहे.‎ शाळेच्या आवारात परसबाग तयार होणार‎ असल्याने मुलांना विविध भाज्या आणि‎ फळांचे उत्पादन घेण्याची संधी मिळणार आहे.‎ तसेच निसर्ग व पर्यावरणाशी विद्यार्थी‎ एकरूप होणार आहेत. परसबाग पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने असल्याने विद्यार्थ्यांना कंपोस्ट, गांडूळ खत ही पर्यावरणपूरक खतांची माहिती मिळणार आहे. परसबाग तयार करत असताना उत्कृष्ठ परसबाग तयार करणाऱ्यांचा सन्मानही केला जाणार आहे. उत्कृष्ट‎ परसबागांसाठी शाळांना तालुका आणि‎ जिल्हास्तरावर बक्षीसही मिळणार आहे.‎
---------------------------------
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन हजार १२८ शाळांमध्ये परसबागा तयार करण्यात आल्या आहेत. त्यापासून शालेय पोषण आहार देण्याचा एक प्रयत्न असून घरगुती पौष्टिक आहार यातून मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्याची आवडही निर्माण होते. पौष्टिक फळे, भाज्या परसबागेतूनच व्हावेत, हा उद्देश समोर ठेवून हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला रायगड जिल्ह्यातील शाळांमधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
- पुनिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद