
...अन् चौथ्या ब्रेकला बसला अपघात
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : बसचालक सतत गाडीला ब्रेक लावत होता. तेव्हाच गाडीतील लोकांनी त्याला बस नीट चालविण्यास सांगितले. रात्र असल्याने अनेक जण झोपेत होते. त्याने सतत तीन वेळा ब्रेक दाबल्याने मनात शंकेची पाल चुकचुकली आणि चौथ्या ब्रेकला बसचा अपघात झाल्याची माहिती अपघातग्रस्त माया किशोर जाधव यांनी ‘सकाळ’सोबत बोलताना दिली.
अंबरनाथ येथील मोरीवली गावाजवळील बंजारा वस्तीत माया या कुटुंबासह राहतात. गुरुवारी (ता. १२) रात्री त्या १५ वर्षीय मुलगा व ११ वर्षीय मुलीसोबत शिर्डी येथे देवदर्शनाला निघाल्या होत्या. सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावाच्या परिसरात शुक्रवारी (ता. १३) सकाळी बसला अपघात झाला. त्यात त्या जखमी झाल्या आहेत. माया यांना काल रात्री रुग्णवाहिकेतून गावात आणण्यात आले. त्यावेळी अपघात घडला, तेव्हा नेमके काय घडले, हे त्यांनी सांगितले.
माया म्हणाल्या की, चालकाने पहिला ब्रेक दाबला, त्यावेळेस बसमधील काही लोकांनी त्याला सांगितले की, गाडी नीट चालव. दुसऱ्यांदा ब्रेक दाबला, त्यानंतर काही वेळाने तिसऱ्यांदा ब्रेक दाबला आणि चौथ्या ब्रेकला गाडीचा अपघात झाला. सुरुवातीला आम्हाला काही कळलेच नाही. अनेक जण बेशुद्ध होतो; परंतु काय झाले, ते नेमके कळत नव्हते. जेव्हा शरीराला वेदना होऊ लागल्या, तेव्हा मार लागला असल्याचे आम्हाला समजले. आजूबाजूला पाहिले असता अपघाताची भीषणता आमच्या लक्षात आली. मी माझ्या मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला, ते दोघेही सुखरूप होते. मला मार लागल्याने रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले.