
पतंग उडवताय तर काळजी घ्या
विक्रमगड, ता. १४ (बातमीदार) : डिसेंबर महिन्याच्या अखेरीस व जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला वेड लागते ते पंतगाचे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आकाशात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवताना दिसून येतात. मकर संक्रांतीला तिळगुळाबरोबरच पतंगाचे वैशिष्ट्य मानले जाते. या पार्श्वभूमीवर विक्रमगड बाजारात पतंग विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यानुसार पतंग खरेदीची लगबगही सुरू झाल्याचे दिसून येत आहे; परंतु या पतंगांसाठी वापरण्यात येणारा मांजा (दोरा) हा अनेक वेळा पक्ष्यांच्या जीवावर बेतणारा ठरतो.
पतंग कापाकापीच्या स्पर्धेमध्ये आपण जिंकावे या उद्देशाने अनेक जण धारदार मांजाचा वापर करतात. या धारदार मांजामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पक्ष्यांना इजा पोहवण्याचा कोणाचाही उद्देश व हेतू नसतो; परंतु स्पर्धांमध्ये आकाशात लांब गेलेल्या पतंगांच्या मांजामध्ये आकाशातून जाणारे पक्षी अडकून त्यांना इजा होण्याचा संभव असतो. त्यामुळे यंदा पतंग उडवताना जरा जपून, असा सल्ला पक्षीमित्रांनी दिला आहे.
-------------------
काचेच्या मांजावर बंदी
मकर संक्रांतीच्या निमित्ताने बाजारात सध्या वेगवेळ्या रंगांचे, आकाराचे पतंग दाखल झाले आहेत. पतंग उडवण्याची एक दिवसाची मजा असली तरी पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार मांजात पक्ष्यांचा नाहक बळी जात आहे. या धारदार मांजामुळे आपले पंख किंवा प्राण त्यांना गमवावे लागत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पतंग उडवण्यासाठी काचेच्या मांजाचा वावर करण्यात येत होता. काचेच्या मांजाविरोधात आंदोलने करून त्यावर बंदी घालण्यात आली आहे.