अविवाहितेकडून पोटच्या नवजात मुलीची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अविवाहितेकडून पोटच्या नवजात मुलीची हत्या
अविवाहितेकडून पोटच्या नवजात मुलीची हत्या

अविवाहितेकडून पोटच्या नवजात मुलीची हत्या

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : मामाच्या मुलासोबत शारीरिक संबंधांतून आठ महिन्यांची गर्भवती राहिलेल्या १९ वर्षीय अविवाहितेने मुलीला जन्म दिल्यानंतर तिची दुसऱ्या मजल्यावरून फेकून हत्या केल्याची घटना नवी मुंबईतील उलवे येथे गुरुवारी (ता. १२) रात्री घडली. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी तरुणीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे.

मूळची यवतमाळची असणाऱ्या तरुणीचे चुलतमामाच्या मुलाशी प्रेमसंबंध जुळले. वर्षभरापूर्वी शारीरिक संबंधांतून ती गर्भवती राहिल्याने ही बाब तिने आई आणि नातेवाईकांपासून लपवून ठेवली होती. गर्भवती असतानाही तिचे पोट मोठे दिसत नव्हते. त्यामुळे सदरची बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. ती काही महिन्यांपूर्वी उलवे येथे मावशीच्या घरी आईसह राहण्यासाठी आली होती. गुरुवारी रात्री तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला पोटदुखीचे औषध देऊन सोनोग्राफीचा सल्ला दिला. ती घरी गेल्यानंतर मध्यरात्री घरातील बाथरूममध्ये तिने मुलीला जन्म दिला.

घडलेल्या प्रकाराने आपली व कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने तिने नवजात मुलीला नाळेसह बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. नवजात अर्भक इमारतीच्या पार्किंगमध्ये पडल्याचे लक्षात आल्यानंतर इमारतीतील रहिवाशांनी शोधाशोध सुरू केली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर एनआरआय पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन अर्भकाला रुग्णालयात नेले असता ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

वैद्यकीय तपासणीनंतर प्रकार उघड
पोलिसांनी नवजात अर्भक टाकणाऱ्याचा शोध घेतला असता ते इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूममधून टाकण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन तरुणीची विचारपूस केली असता तिने काहीही माहिती दिली नाही; परंतु पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पालिका रुग्णालयात तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेले. या ठिकाणी तिने नवजात बाळाला जन्म दिल्याचे उघड झाले.