तरुण मतदारांची संख्या वाढली

तरुण मतदारांची संख्या वाढली

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण मतदार संख्येत ७९ हजार ५६२ एवढी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १८ ते १९ वयोगटात १९ हजार ३९४ नवीन मतदार, तर २० ते २९ वयोगटातील ३० हजार ४७१ मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे.
भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीत मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनासाठी मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या बैठका घेऊन मतदार नोंदणी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी पाठपुरावा करून मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न केले. प्रारूप मतदार यादीत जिल्ह्यात ३३ लाख २८ हजार ९ पुरुष व २८ लाख ६ हजार ९३ महिला आणि इतर ८५३ असे एकूण ६१ लाख ३४ हजार ९५५ एवढे मतदार होते. अंतिम मतदार यादीत ही संख्या ७९ हजार ५६२ ने वाढून पुरुष ३३ लाख ६७ हजार १२० मतदार, महिला २८ लाख ४६ हजार ३१९ व १०७८ इतर असे एकूण ६२ लाख १४ हजार ५१७ मतदार झाले आहेत.
विशेष म्हणजे अंतिम यादीनुसार जिल्ह्यात युवा मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. ९ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या एकत्रिकृत प्रारूप मतदार यादीत १८ ते १९ वयोगटातील २६ हजार ७०५ मतदार होते. ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीत ही संख्या १९ हजार ३९४ ने वाढून ४६ हजार ९९ एवढी झाली आहे. तसेच २० ते २९ वयोगटातील प्रारूप यादीत ९ लाख ९० हजार ९८४ मतदारांची नोंदणी होती. अंतिम यादीत ही संख्या ३० हजार ४७१ ने वाढून १० लाख २१ हजार ४५५ एवढी झाली आहे.
..........
भावी १७ हजार ३८८ मतदारांची नोंदणी
मतदार संख्या वाढावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी, १ फेब्रुवारी, १ जुलै व १ ऑक्टोबर या चार अर्हता दिनांक घोषित केल्या आहेत. तसेच विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम २०२३ दरम्यान १७+ भावी मतदारांच्या नाव नोंदणीसाठी विशेष समर्पित सहायक मतदार नोंदणी अधिकारी नेमण्यात आले होते. त्यांच्यामार्फत मोहीम राबवून युवा मतदारांची नोंदणीसाठी शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे जिल्ह्यात १७ वर्षे पूर्ण झालेल्या भावी मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून जिल्ह्यात १७ हजार ३८८ युवकांनी विधानसभा मतदारसंघ स्तरावर अर्ज केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com