
वाढलेल्या थंडीचा मच्छीमारीवर परिणाम
विरार, ता. १५ (बातमीदार) : सध्या पालघर जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत आहे. या वाढत्या थंडीचा फटका मोठ्या प्रमाणावर मच्छीमारीला बसू लागला आहे. कारण जाळ्यात मासे येण्याच्या प्रमाणात घट झाली आहे.
ऑगस्टपासून मच्छीमारीचा हंगाम सुरू झाला आहे. अशात वाढत्या थंडीचा फटका समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना बसत आहे. त्यामुळे मच्छीची आवक घटल्याने मच्छीचे भाव वाढले आहेत. थंडीच्या दिवसांत मासे जास्त मिळत नसल्याने या दिवसांत मच्छीमार आपले हिशोब करण्यात तसेच घरातील, नात्यातील लग्नसराईमध्ये गुंतल्याचे चित्र सध्या पालघर जिल्ह्यात दिसू लागले आहे. वसई, नायगाव या भागात मोठ्या प्रमाणात माशांचा लिलाव सुरू असतो; परंतु त्या ठिकाणीही गर्दी कमी झाली आहे. बाजारात मोठी सुरमई, रावस, काटी एवढीच मच्छी येत असल्याने त्याचे भावही वाढू लागले आहेत. मोठी सुरमई, रावस हे या माशांना ५०० रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिकर दर मिळत आहे.
======
थंडीच्या काळात मासेमारी कमी होत आहे. सध्या जवळपास ५० टक्के बोटी समुद्रात गेल्या आहेत, तर इतर बोटींचे मालक, त्यांचे भागीदार, खलाशी आपला हिशोब करण्यात गुंतले आहेत. दुसऱ्या बाजूला लग्नसराईचा मोसम सुरू झाला असल्याने कोळी बांधव आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत.
- निवृत्ती घुसेकर, नायगाव