थंडीमुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थंडीमुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले
थंडीमुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

थंडीमुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १५ (बातमीदार) : गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत आहे. या अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांत वाढ होत आहे. याचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यावर होत आहे. वाढत्या थंडीमुळे खासगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्दी-खोकल्याचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
थंडीमध्ये वृद्धांना सांधेदुखी, अंगदुखी, गुडघेदुखी, उच्च रक्तदाबाच्या त्रासाची भीती असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत वृद्धांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असते. तसेच खोकला, सर्दी, तापाची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉक्टर अनिल पाटील यांनी सांगितले.
थंडीच्या मोसमामध्ये सर्दी आणि खोकल्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. घसा खवखवणे, ताप येणे, कान दुखणे असे दररोज रुग्ण हे रुग्णालयात येत आहेत. लहान मुलांमध्ये थंडीच्या दिवसांत कफाचे प्रमाण वाढते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लहान मुलांना वाफ देण्यासाठी रुग्णालयांमध्ये पालक हे घेऊन जात आहेत. औषध उपचारांनी मुले ही बरी होत आहेत, तसेच लहान मुलांच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करावा, असे बालरोगतज्ज्ञ राज जाधव यांनी सांगितले.

आहारात काय घ्यावे
वातावरणातील बदलामुळे शरीराला ऊजेची मोठ्या प्रमाणात गरज असते. त्यामुळे शरीराला सतत खाण्याची इच्छा होते. थंडीच्या दिवसांत दालचिनी, लवंग, केसर, मोहरी, तीळ, मध, साजूक तूप, आले, सुकामेवा अशा गरम पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करणे गरजेचे असते. तसेच थंडीमध्ये बाजरीची भाकरी, जवस, तिळाची चटणी इत्यादी आहारात असावे, असे आहारतज्ज्ञ अर्जुन काटे यांनी सांगितले.