अवजड वाहनांची वाहतूक रिफ्लेक्टरविना धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवजड वाहनांची वाहतूक रिफ्लेक्टरविना धोकादायक
अवजड वाहनांची वाहतूक रिफ्लेक्टरविना धोकादायक

अवजड वाहनांची वाहतूक रिफ्लेक्टरविना धोकादायक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : केंद्र सरकारच्या आदेशानंतर आता राज्यात वाहनांना ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (एआयएस) प्रमाणित परावर्तक (रिफ्लेक्टर) लावणे बंधनकारक आहे; मात्र त्यानंतरही अवजड, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसवर एआयएस प्रमाणित रिफ्लेक्टर लावण्यात आलेले दिसत नाहीत. निकृष्ट दर्जाच्या रिफ्लेक्टरचा वापर केला जात असून, पहाटे आणि रात्रीच्या धुक्यामध्ये वाहनांवरील रिफ्लेक्टर रिफ्लेक्ट होत नसल्याने अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. काही दिवसांमध्ये वाढलेल्या थंडीमुळे निर्माण झालेल्या धुक्यात अपघातांची शक्यता वाढली आहे.
रात्रीच्या प्रवासात अपघात होऊ नये, वाहनांमध्ये सुरक्षित अंतर राहावे, यासाठी केंद्र सरकारने एआयएस प्रमाणित रिफ्लेक्टर लावण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावरील वाहनांचे वाढते अपघात लक्षात घेता वाहनांच्या दोन्ही बाजूंना मान्यताप्राप्त वितरकाकडून प्रमाणित रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक आहे. शिवाय रिफ्लेक्टर टेप आणि वाहनाच्या मागील बाजूला रिअर मार्किंग प्लेट बसवणे अनिवार्य असेल. त्यामुळे रात्री रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना सुरक्षित अंतर ठेवण्यास मदत होईल असेही सांगण्यात आले होते. तत्कालीन राज्य परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत. खासगी वाहनांवर रिफ्लेक्टर न लावल्यास मोटार वाहन नियमांतर्गत चालकांवर कारवाई करून व्यावसायिक वाहनांची योग्यता तपासणी रद्द करण्याच्या सूचनासुद्धा दिल्या; मात्र त्या सूचनांची सध्या प्रभावी अंमलबजावणी दिसून येत नाही.
अनेक वाहनांचे रिफ्लेक्टर लावले नसल्यासारखेच असून आणि आरटीओने ठरवून दिलेल्या जागी लावलेले नसल्यानेसुद्धा रात्रीच्या प्रवासात आणि धुक्यामध्ये अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे परिवहन विभागातील एका वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्याने सांगितले.
...
प्रमाणित रिफ्लेक्टर लावण्याचे फायदे
- रात्रीच्या प्रवासात धुके असेल तरी दुरूनच वाहन दिसून सुरक्षित अंतर ठेवण्यास होईल मदत
- वाहनाला ओव्हरटेक करतानासुद्धा वाहनांचा अंदाज येईल
- वाहन कोणत्या प्रकारातील आहे त्याचाही अंदाज येईल
- रिफ्लेक्टर बघताच पुढच्या वाहनाला बसणारी धडक टाळता येईल
- रस्त्यावर उभे असलेले नादुरुस्त वाहन दिसण्यास मदत
...
२०२१ मध्ये धुक्यामुळे झालेले अपघात
वर्ष २०२१ मध्ये १८४ प्राणघातक अपघात झाले असून १९५ लोकांना गंभीर दुखापतीचे अपघात, त्याप्रमाणेच ८२ किरकोळ दुखापतीचे अपघात, ६३ विनादुखापतीचे अपघात असे एकूण ५२४ अपघात झाले. यामध्ये २०२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ३४७ लोकांना गंभीर दुखापती झाल्या आहेतड; तर १२७ लोकांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी नोंदवली आहे.