लग्नाच्या स्टॅम्प पेपरवर शिक्कामोर्तब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाच्या स्टॅम्प पेपरवर शिक्कामोर्तब
लग्नाच्या स्टॅम्प पेपरवर शिक्कामोर्तब

लग्नाच्या स्टॅम्प पेपरवर शिक्कामोर्तब

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने तिच्यासोबत लग्न करत असल्याबाबतचा स्टॅम्प पेपर कोल्हापूरमधील घरात पोलिसांना सापडला होता. पंच बाळासाहेब सत्याप्पा आळतेकर यांनी त्यावरील मजकुरासह तो न्यायालयात ओळखत स्टॅम्प पेपर सील करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकर यांच्यातील संबंधांचा महत्त्वाचा पुरावा असलेल्या स्टॅम्प पेपरवर न्यायालयात शिक्कामोर्तब झाल्याने आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पनवेल सत्र न्यायालयात न्या. के. जी. पालदेवार यांच्यासमोर अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा खटला आता अंतिम टप्प्यात आला आहे. न्यायालयात अश्विनीचे वडील जयकुमार बिद्रे (वय ७३), पंच बाळासाहेब सत्याप्पा आळतेकर (वय ७२) व इतरांची साक्ष आणि उलटतपासणी शुक्रवारी (ता. १३) पूर्ण झाली. या वेळी बिद्रे यांची उलटतपासणी जवळपास तीन तास चालली होती.

तळोजा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक माने यांनी अश्विनीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आळते येथे वडिलांच्या घरातील तिच्या खोलीची झडती पंच बाळासाहेब आळतेकर व जयकुमार बिद्रे यांच्यासमोर घेतली होती. त्या वेळी शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर सापडला होता. त्यावर कुरुंदकर याने अश्विनीबरोबर स्वखुशीने लग्न करत असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे कथन केले आहे. हे कागदपत्र आळतेकर यांनी मजकुरासह ओळखले. त्याचप्रमाणे झडतीदरम्यान सापडलेले काळ्या आणि सोनेरी रंगाचे पेन, कॅमेरा, पेन ड्राईव्ह त्यांनी ओळखून त्यांच्यासमोर ते सील केल्याचे न्यायालयात सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी २० जानेवारीला होणार आहे.

घरात साफसफाईचे काम करणाऱ्या महिलेची उलटतपासणी
कुरुंदकर याच्या घरात साफसफाईचे काम करणारी रेखा गोपाल गौड (वय ४२) व तिचा पती गोपाल यांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली. एप्रिल २०१६ मध्ये रेखा गावी गेली असताना कुरुंदकर यांचा चालक कुंदन भंडारी याने त्यांच्या घरात रंगकाम करायचे आहे, असे सांगून घराची चावी मागितली होती. त्या वेळी तिने पतीमार्फत चावी दिली. ती गावावरून परतल्यानंतर घरातील रंगकाम अद्याप सुरू असल्याने काम पूर्ण झाल्यानंतर येण्यास कुंदनने सांगितले होते. त्यानंतर तीन दिवसानंतर कुंदनने नवघर पोलिस ठाण्यात घराची चावी दिल्याचे तिने न्यायालयात सांगितले.