मेंगाळवाडीची पाण्यासाठीची वणवण थांबणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेंगाळवाडीची पाण्यासाठीची वणवण थांबणार
मेंगाळवाडीची पाण्यासाठीची वणवण थांबणार

मेंगाळवाडीची पाण्यासाठीची वणवण थांबणार

sakal_logo
By

नेरळ, ता. १७ (बातमीदार) : कर्जत तालुक्यात आदिवासी दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे. या भागात पाण्याचेही दुर्भिक्ष्य आहे. तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या मेंगळवाडीची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. भर पावसाळ्यातही येथील आदिवासी बांधवांना खड्ड्यातून पाणी पिण्याची वेळ येते. नेरळ येथील शिक्षक रवी काजळे यांनी ही समस्या रोटरी क्लबच्या निदर्शनास आणून दिली. रोटरी क्लबने या ठिकाणी बोअरवेल मंजूर केली आहे. त्यामुळे मेंगळवाडीच्या आदिवासी बांधवांची पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे.
कर्जत तालुका हा तसा निसर्गाने समृद्ध, पर्यावरणपूरक, नैसर्गिक वरदहस्त असलेला आहे. डोंगर, दुर्गम भाग असल्याने आदिवासी समाजाचे वास्तव्यही या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कर्जतला आदिवासीबहुल तालुका अशी बिरुदावली लाभली आहे. आदिवासी समाजासाठी जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प कार्यालयही आहे. शासकीय विविध योजना या समाजाच्या विकासासाठी राबवल्या जातात; मात्र तरी आजही तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीतील मेंगाळवाडीत आदिवासी बांधवांपुढे समस्यांचा सुकाळ आहे. पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागते. साधारण ३० ते ३५ घरांची वस्ती असलेल्या मेंगाळवाडीत १०० ते १२५ लोक राहतात. वाडीसाठी दोन विहिरी आहेत; मात्र वाडीपासून विहिरींचे अंतर खूप आहे. पाण्यासाठी या वाडीतील बांधवांना उन्हाळ्यात वणवण तर करावी लागतेच; पण पावसाळ्यातसुद्धा त्यांचे दुःख सरत नाही.
ही बाब शिक्षक रवी काजळे यांना समजताच त्यांनी रोटरी क्लबच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार रोटरी क्लब डोंबिवली शहर सचिव सविता नाझरे, प्रोजेक्ट हेड मंदार, विजय नाझरे, शिक्षक रवी काजळे यांनी नुकतीच वाडीत येऊन पाहणी केली. येथील परिस्थिती पाहता तात्काळ या योजनेस मंजुरी दिली. बोअरवेल मारण्याच्या कामास लवकरच सुरुवात केली जाणार आहे. गावात बोअरवेल होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

पाण्यासाठी कसरत
पावसाळ्यातही मेंगाळवाडीतील बांधवांचे पाण्यासाठी हाल होत असते. पाण्यासाठी ते गावाजवळील डोंगराच्या कपारीत खड्डा करतात. ज्याला आदिवासी लोक डवरा म्हणतात. त्यात पाणी साठवून ते वाडग किंवा छोट्या पातेल्याच्या साह्याने भांड्यात भरून घेतात. हेच पाणी ते पिण्यासाठी वापरतात.

आम्हाला वाडीत पाण्याची मोठी समस्या आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत बायकांना डोक्यावरून हंडा घेऊन पायपीट करून पाणी आणावे लागते. विहिरी लांब असल्याने पावसाळ्यात डवरा (खड्डा) खोदून त्यात पाणी जमा करावे लागते. आता बोरिंगमुळे वाडीत पाणी आले तर बरे होईल. आम्ही आनंदी आहोत.
- जना बांगरे, ग्रामस्थ