
चलो चले मोदी के साथ!
मुंबई, ता. १५ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १९ जानेवारीला मुंबईत येत असून त्यांच्या स्वागतासाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या बैठका सुरू आहेत. मुंबईत भाजपतर्फे सुरू असलेल्या अनेकविध प्रयत्नांना आता शिंदे गटाचीही साथ मिळत आहे.
बांद्रा कुर्ला परिसरातील बीकेसी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला किमान एक लाख लोक हजर राहतील, अशी तयारी सुरू आहे. भाजपने या सभेचे संपूर्ण नियोजन अत्यंत काटेकोरपणे केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावोस येथील आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेसाठी दोनही दिवस जायचे टाळले आहे. मुंबई भाजपचे प्रमुख आशीष शेलार यांनी विभागवार बैठका सुरू केल्या आहेत. महापालिका निवडणूक तयारीचा भाग म्हणून या आयोजनाकडे पाहिले जाते आहे. या वेळी भाजपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचीही साथ आहे. मुंबईत वर्चस्व निर्माण व्हावे, यासाठी दोन्ही पक्ष एकत्रितपणे काम करीत आहेत. सभेला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो स्थानकाकडे जातील. विविध उपक्रमांचे उद्घाटनही या वेळी केले जाईल.