पार्किंग जागेतील वाहने असुरक्षित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पार्किंग जागेतील वाहने असुरक्षित
पार्किंग जागेतील वाहने असुरक्षित

पार्किंग जागेतील वाहने असुरक्षित

sakal_logo
By

डहाणू, ता. २१ (बातमीदार) : डहाणू रोड रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळ जागेचे भाडे ठेकेदाराने थकवल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पार्किंगचा ठेका काढून घेतला आहे. त्यामुळे सध्या येथे पार्किंग करण्यात येणारी वाहनेही असुरक्षित झाली आहेत.

मागील दहा वर्षांपासून डहाणू रोड रेल्वे स्थानकातून उपनगरीय रेल्वे सेवा सुरू झाल्याने येथे प्रवाशांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे वाहन पार्किंगमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनानेदेखील रेल्वेच्या दोन्ही बाजूला प्रशस्त पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे प्रशासनाने पार्किंग स्थळाचा ठेका खासगी ठेकेदारांना तीन तीन वर्षांसाठी दिला होता. ठेकेदाराकडून सुरुवातीच्या तीन महिन्यांचे भाडे आगाऊ स्वरूपात आकारण्यात येते. रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील भाग हा २२० स्क्वेअर मीटर जागेकरिता अंदाजे दोन लाख ३२ हजार व पश्चिमेकडील १२०० स्क्वेअर फूट जागेकरिता अंदाजे आठ लाख रुपये तिमाही भाडे आकारण्यात येत असल्याचे समजते.

-------------------
बेकायदा पार्किंगवरही कारवाई गरजेची
या पार्किंग लॉटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहने पार्क केली जात होती. त्या वेळी वाहने सुरक्षित राहत होती; परंतु आता मात्र पार्किंगचे भाडे वाचवण्याच्या दृष्टीने काही वाहनचालक पार्किंग लॉटमध्ये वाहने पार्किंग न करता इतर कुठेही रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर पार्किंग करत आहेत. त्यातच सध्या वाहनचोरीचे प्रमाणही वाढत चालले असून वाहनातील पेट्रोल चोरीही होत आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यासाठी नगर परिषदेकडून अशा बेकायदा वाहन पार्किंगवर कारवाई करण्याची गरज आहे.

-------------------
डहाणू रोड रेल्वे स्थानक परिसरात वाहन पार्किंगचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराने दोन वेळचे २० लाख रुपये वाहन पार्किंग ठेक्याची रक्कम थकवली आहे. त्याच्याकडून वाहन पार्किंग ठेका काढून घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे विभागीय कार्यालयामार्फत नव्याने टेंडर मागवण्यात येऊन त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ती पूर्ण होईपर्यंत डहाणू रोड रेल्वे स्थानक परिसरात पार्किंग करण्यात येणारी वाहने ही वाहनचालक आपल्या जबाबदारीवर पार्किंग करीत आहेत. त्याला रेल्वे कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही.
- राघव खरा, डहाणू रोड, रेल्वेस्थानक व्यवस्थापक